पावसाळा सुरू झाला की विविध आजार डोके वर काढतात आणि रुग्णांच्या संख्येत वाढ व्हायला लागते. परंतु, उन्हाच्या झळा सोसल्यानंतर पावसाच्या सरीचे मुंबईकरांनी स्वागत केले असले तरीही आता मध्येच अचानक ब्रेक घेणा-या पावसामुळे साथींच्या आजाराने मुंबईकरांना आपले सावज करण्यास सुरुवात केली आहे. वातावरणातील बदलामुळे आजूबाजूच्या परिसरातील दवाखाने हाऊसफुल्ल व्हायला लागले आहेत.
दूषित पाण्यामुळे होणा-या हिवताप, लेप्टो, डेंग्यू, कावीळ, उलटय़ा, गॅस्ट्रो, टायफॉईड यांसारख्या आजारांवर स्वच्छता हाच एकमेव उपाय आहे. परिसरात कचरा आणि पाणी साचणार नाही याची काळजी घेतल्यास मलेरिया किंवा डेंग्यू यांसारख्या आजारांवर सहज मात करता येईल. लहान मुलांनाही विविध आजारांची लागण व्हायला लागली आहे. ताप, पडसं, हिवताप, जुलाब आणि उलटय़ा यांसारख्या आजारांमुळे मुलेही अक्षरश: हैराण झालेली आहेत. याशिवाय डासांची उत्पत्ती जास्त झाल्याने रुग्णांमध्येही वाढ होत असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे पावसाळ्यात योग्य पद्धतीने आरोग्याची काळजी घेतल्यास आजारांवर मात करता येईल.
कीटकजन्य आजारांचा मुंबईकरांना धोका
डासांच्या उत्पत्तीमुळे होणारे मलेरिया, चिकणगुनिया, डेंग्यू यांसारख्या आजाराने मुंबईकरांना अक्षरश: हेलावून सोडले आहे. दरम्यान, कीटकजन्य आजारांमुळे मुंबईत बहुतांश जणांचा मृत्यू होतो. या मृतांमध्ये अनेक जण झोपडपट्टय़ांमध्ये राहणारे आहेत. उपचारासाठी पैसे नसल्याने रुग्णालयात जाणे टाळतात. त्यानंतर कुठल्यातरी बोगस डॉक्टरांकडे जाऊन कमी पैशात उपचार करून घेतात. दरम्यान, सध्या झोपडपट्टय़ांसारख्या परिसरात बोगस डॉक्टरांचा प्रसार वाढत आहे. त्यामुळे, या डॉक्टरांना रुग्णांच्या आजाराचे निदान उत्तमरित्या करता येत नाही. योग्य वेळी निदान न झाल्याने आजार बळावतो. त्यानंतर रुग्ण जेव्हा रुग्णालयात दाखल होतो. तेव्हा खूप उशीर झालेला असतो. या आजारांमुळे शरीरातील अवयव निकामी झाल्याने डॉक्टरांचे सर्व प्रयत्न फोल ठरतात. याशिवाय सध्याचे वातावरण हे कीटकजन्य आजारांच्या प्रसारासाठी पोषक असल्याने काळजी न घेतल्यास भयंकर संकट ओढावण्याची शक्यता आहे. त्यामुळे पालिका प्रशासन विविध स्तरावर प्रयत्न करत असताना नागरिकांनी सुद्धा या आजारावर मात करण्यासाठी विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. विशेषत: झोपडपट्टय़ांसारख्या परिसरात जिथे पाणी आणि डासांच्या उत्पत्तीचे प्रमाण अधिक आहे. त्याठिकाणी नागरिकांनी स्वच्छता राखणे आवश्यक आहे. तरंच आपण या आजारावर पूर्णपणे मात करू शकतो, असे मत पालिकेच्या कीटकनाशक विभागाचे अधिकारी राजेंद्र नारिंग्रेकर यांनी व्यक्त केले.
१. हिवताप
हिवताप हा प्रामुख्याने परिसरातील डासांमुळे होतो. एॅनालिफिस नामक डास चावल्यास या आजाराची लागण ताबडतोब होते. जेव्हा एॅनालिफिस जातीच्या मच्छराची मादी हिवताप झालेल्या रुग्णाला चावते, तेव्हा रक्तवाहिन्यांमधील प्लाझ्मोडियम मच्छराच्या शरीरात शिरतात. त्यावेळी रक्ताद्वारे ते यकृतात प्रवेश करतात. यकृतामधील पेशींना संक्रमित करून ते पुढील अवस्थेत विकसित होतात. या अवस्थेत ते पेशींना नष्ट करून रक्तप्रवाहात येतात. त्यानंतर संबंधित व्यक्तीला हिवतापाची लागण होते.
लक्षणे –
- थंडी भरून ताप येणे.
- यकृताला सूज येणे.
- उलटय़ा
उपाय –
ताप येऊ नये यासाठी डास न चावणे हा एकमेव खात्रीशीर उपाय आहे. डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी पाणी साठू न देणे हा सर्वात महत्त्वाचा उपाय आहे. त्याचप्रमाणे घराला मच्छरप्रतिबंधक औषध, जाळ्या, फवारे इत्यादींचा वापर करावा.
२. लेप्टो
लेप्टो होण्याची कारणे:-
- पावसाळ्यात रस्त्यावर साचलेल्या पाण्यामुळे लेप्टोचा संसर्ग होतो.
- उंदराचे मलमूत्र पाण्यात मिसळते आणि ते पाणी एखाद्या व्यक्तीच्या जखमेच्या संपर्कात आल्यास लेप्टोचे विषाणू शरीरात प्रवेश करतात.
- झोपडपट्टय़ांमधील नागरिकांना या आजाराची शक्यता अधिक असते.
लक्षणे
- ताप, अंगदुखी, डोकेदुखी आणि पोटदुखी
कोणती काळजी घ्याल
- संसर्ग रोखण्यासाठी पावसाळ्यात साचलेल्या पाण्यातून जाऊ नये.
- साचलेल्या पाण्यातून जाताना गमबूट घालावे.
- उघडय़ा जखमांचा पाण्याशी संपर्क येणार नाही, याची काळजी घ्यावी.
- लेप्टो या आजाराची लवकरच तपासणी करून घ्यावी.
३. डेंग्यू
डेंग्यू हा एक विषाणूजन्य रोग आहे. डेंग्यू विषाणूंमुळे ताप होतो. एडिस इजिप्ती डास चावल्याने याचा प्रसार होता. हा एक तीव्र आजार आहे. एडिस इजिप्ती हा एक लहान, काळा डास असून त्याच्या अंगावर पांढरे पट्टे असतात आणि त्याचा आकार अंदाजे ५ मिलीमीटर असतो. हा व्यक्तीच्या शरीरात विषाणू तयार करायला सात ते आठ दिवस घेतो आणि त्यानंतर रोगाचा प्रसार करतो. साधारणपणे हे डास सकाळी किंवा सायंकाळी चावतात. मुळात या आजाराचे दोन प्रकार आहेत. डेंग्यू ताप आणि डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप (डीएचएफ) डेंग्यू रक्तस्रावात्मक ताप हा एक अधिक तीव्र स्वरूपाचा आजार आहे. हा आजार झाल्यास शरीरावर चट्टे येणे, हिरडय़ांमधून रक्तस्राव होणे. प्लेटलेटची संख्या कमी होणे इत्यादी प्रकार होऊ लागतात. तसेच छातीत,पोटामध्ये पाणी जमा होऊ शकते. त्यामुळे या आजारामुळे रुग्णाचा मृत्यू होण्याची दाट शक्यता असते.
लक्षणे –
- ताप येणे.
- डोक्याचा पुढचा भाग अतिशय दुखणे.
- स्नायू आणि सांध्यांमध्ये वेदना.
- भूक न लागणे.
- छाती अन्य अवयवांवर गोवरासारखे पुरळ येणे.
- मळमळणे आणि उलटय़ा.
- त्वचेवर व्रण उठणे.
उपाय
- ताप आल्यास डॉक्टरांकडे जावे.
- जलपेयांचा जास्तीत-जास्त उपयोग करावा.
- रक्तस्राव होत असल्यास रुग्णाला रुग्णालयात दाखल करावे.
- डासांवर आळा घालण्यासाठी आजूबाजूच्या परिसरात पाणी साचू न देणे.
४. गॅस्ट्रो
दूषित पाण्यामुळे या आजाराचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होतो. तसेच उघडय़ावरचे पदार्थ खाल्ल्याने, पाणी उकळून आणि गाळून न प्यायल्याने गॅस्ट्रोची लागण आणि प्रसार होतो.
लक्षणे
- पोट दुखणे आणि जुलाब होणे.
- उलटय़ा होणे, डोळे खोल जाणे.
- तोंड कोरडे पडणे.
- वजन कमी होणे.
- उपाय
- पाणी उकळून आणि गाळून पिणे.
- घराच्या परिसरात स्वच्छता राखणे.
- शौचालयातून आल्यावर हात-पाय स्वच्छ धुणे.
- जास्त त्रास होत असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेणे.
५. कावीळ
कावीळ हा विषाणूजन्य आजार आहे. या आजाराचा प्रसार दूषित पाणी, दूषित अन्न आणि वैयक्तिक अस्वच्छता अशा विविध कारणांमुळे होतो. डोळे, लघवी, नखे पिवळी दिसतात. काविळीची लागण झाल्यास त्याचा यकृतावर परिणाम होण्याची दाट शक्यता असते. शरीरात पित्तनलिकेत काही अडथळा असला तर कावीळ होते.
लक्षणे
- ताप येतो.
- भूक कमी होते.
- मळमळ व उलटय़ा होतात.
- लघवी गडद पिवळी होऊ लागते.
- डोळे पिवळे दिसू लागतात.
- ब-याच वेळा पोटाच्या वरच्या भागात दुखते.
उपाय
- पिण्यासाठी स्वच्छ पाण्याचा वापर करावा.
- रस्त्यावरील पाणी पिणे शक्यतो टाळावे.
- उघडय़ावरील पदार्थ खाऊ नयेत.
- फळं किंवा भाज्या स्वच्छ धुवून घ्याव्यात.
- गरोदर स्त्रियांमध्ये काविळीची लक्षण दिसून आल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
६. स्वाईन फ्लू
स्वाईन फ्लू हा इन्फ्लुएन्झा ए या विषाणूंपासून होणार आजार आहे. याचा प्रादुर्भाव प्रामुख्याने डुकरांपासून होतो. डुकरांच्या संपर्कात राहणा-या व्यक्तींना हा आजार होण्याची शक्यता असते. मुळात एच१एन१ हा प्रामुख्याने श्वसनसंस्थेचा आजार असून याचा प्रसार हवेमार्फत खोकताना, शिंकताना होतो. त्यामुळे रुग्णाच्या संपर्कात राहिल्यास नाका-तोंडाद्वारे हे विषाणू शरीरात पोहोचतात. तसेच खोकल्यावर, शिंकल्यावर हे विषाणू हवेमध्ये व इतरत्र वस्तूंवर काही काळ जिवंत राहतात. त्यामुळे या दरम्यान, एखादा व्यक्ती याच्या संपर्कात आल्यास त्यालाही स्वाईन फ्लूची लागण होऊ शकते. मुळात फ्लूच्या विषाणूचा प्रसार अन्नपदार्थाद्वारे होत नाही. परंतु, जेवणापूर्वी हात स्वच्छ धुणे व मांस योग्य तापमानापर्यंत शिजवून खाणे गरजेचे आहे. शहरात या आजाराचा प्रसार मोठय़ा प्रमाणात होतो.
लक्षणे
- ताप येणे.
- घसा खवखवणे.
- अंगदुखी, डोकेदुखी.
- थकवा जाणवणे.
- अतिसार, उलटय़ा होणे.
- अचानक तोल जाणे.
- लघवी थांबणे.
- श्वसनाचा त्रास होणे.
- लहान मुलांमध्ये त्वचा निळसर होणे, भूक मंदावणे, तापाबरोबर अंगावर पुरळ येणे.
उपाय
- सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळावे.
- खोकताना, शिंकताना रुमालाचा वापर करा.
- नाक व तोंडावर मास्क बांधावा.
- वापरलेले मास्क नष्ट करावे.
- हात वारंवार साबणाने धुणे.
- भरपूर पाणी प्यावे, संतुलित आहार घ्यावा.
- डॉक्टरांचा तात्काळ सल्ला घ्यावा.
