वसई खाडीमध्ये नौदलाच्या पाणबुडय़ांच्या साहाय्याने पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे गोरे यांच्या मृतदेहाचा सोमवारी दिवसभर शोध घेण्यात आला. पाणबुडय़ांनी ३ तास २० मिनिटे खाडीच्या पाण्यात शोध घेतल्यानंतरही पोलिसांच्या हाती काहीही लागले नाही. या शोधमोहिमेबाबत पोलिसांकडून मात्र मौन बाळगण्यात आले आहे.
अश्विनी बिद्रे यांच्या मृतदेहाचे तुकडे करून ते वसई खाडीत फेकल्याची माहिती या प्रकरणातील एक आरोपी महेश फळणीकर याने दिल्यानंतर सोमवारी वसई खाडीत शोधमोहीम हाती घेण्यात आली. नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे, तपास अधिकारी नीलेश राऊत, संगीता शिंदे अल्फान्सो आदी अधिकाऱ्यांचे पथक वसई खाडी किनाऱ्याला दाखल झाले. ठाणे ग्रामीण पोलीस अधिकारीदेखील या वेळी उपस्थित होते. आरोपी महेश फळणीकर याने वसई खाडी पुलावरून मृतदेहाची लोखंडी पेटी ज्या ठिकाणी खाडीत टाकली ती जागा पोलिसांनी दाखवली.
नौदलाच्या नऊ पाणबुडय़ांचे पथक या शोधकार्यात सहभागी झाले होते. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पाणबुडय़ांचे पथकाने आपल्या उपकरणांसह खाडीच्या पाण्यात मृतदेहाचा शोध घेण्यास सुरुवात केली. या ठिकाणी पाण्याची खोली सुमारे दहा मीटर खोल आहे. सुमारे पावणेदोन तास शोध घेतल्यानंतर काही काळ शोधकार्य थांबविण्यात आले. त्यानंतर चार वाजण्याच्या सुमारास पाणबुडय़ांनी पुन्हा शोधकार्यास सुरुवात केली. परंतु सायंकाळपर्यंत काहीच हाती न लागल्याने हे शोधकार्य थांबविण्यात आले. त्याआधी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणातील मुख्य आरोपी पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर राहत असलेल्या भाईंदर पूर्व येथील घराची तपासणी केली. गेल्या आठवडय़ात या घरातून मृतदेह ठेवण्यात आलेली शीतपेटी पोलिसांनी जप्त केली होती. सोमवारी झालेल्या शोधकार्याबाबत कोणतीही माहिती देण्यास पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी नकार दिला. शोधकार्य सुरू आहे, तुम्ही त्यात अडथळा आणू नका. तपास पूर्ण झाल्यानंतर त्याची माहिती देण्यात येईल, असे नगराळे यांनी प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
तपासकार्याबाबत असमाधानी
या शोधकार्याच्या वेळी अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे उपस्थित होते. आपला केवळ पोलीस अधिकारी संगीता शिंदे यांच्यावरच विश्वास असून पोलिसांकडून सुरू असलेल्या तपासकार्यावर पूर्ण असमाधानी असल्याचे त्यांनी सांगितले. या प्रकरणातील पुरावे न्यायालयात सादर केले जात नाहीत तसेच पोलीस आरोपीला सहकार्य करीत असल्याचे आरोपदेखील गोरे यांनी केले.
