पुण्यासारख्या शहरात स्वत:चं घर असावं, असं कुणाला वाटणार नाही… मात्र, कष्टकरी आणि हातावर पोट असणाऱ्यांसाठी हे दिवा स्वप्नचं… पण घरकाम करणाऱ्या महिलांनी एकत्र येत ही अशक्यप्राय गोष्ट साध्य करुन दाखवलीय.
पुण्यातील उरुळी देवाची या भागामध्ये दिमाखात उभा असलेला ‘वैष्णवी सिटी’ हा गृहप्रकल्प… इतर गृहप्रकल्पांसारखाच वेल प्लॅन्ड आणि उत्तम दर्जाचं बांधकाम असणारा… हा प्रकल्प कोणीही बांधकाम व्यावसायिकाने उभारलेला नाही… तर तो उभा राहिलाय इथं वास्तव्याला असणाऱ्या महिलांच्या बचतगटाच्या माध्यमातून…
राजश्री नागाने यांची ही संकल्पना… २००६ साली महिला उन्नती बचत गटाच्या माध्यमातून त्यांनी बचतगटांना कर्ज आणि रोजगार मिळवून देण्यास सुरुवात केली पण त्यांचं उद्दीष्ट त्याही पलिकडले होतं. २००७ साली ‘वैष्णवी सिटी’ची संकल्पना पुढे आली… आणि हक्काचं घर मिळवण्यासाठी या महिलांनी कंबर कसली.
जागा मिळविण्यापासून ते सगळ्या परवानग्या काढणं, कॉन्ट्रॅक्टर नेमणं, कामाची देखरेख करणं, महिलांना कर्ज मिळवून देणं या सगळ्यासाठी महिलांसह राजश्री नागाने यांनी रात्रीचा दिवस केला… आणि २०१६ साली वैष्णवी सिटी फेज-१ पूर्णत्वास आला. महिन्याला केवळ काही शे बचत करणाऱ्या महिलांनी एकत्र येत कोटींपर्यंत गुंतवणूक करुन ४०० सदनिका असलेला वैष्णवी सिटी हा गृहप्रकल्प उभा करून दाखवला.
