वडिलांच्या निधनानंतर भाऊ वेगळा झाला. वृद्ध आई आणि ती दोघेच एकमेकांसाठी आधार ठरल्या. दोघींनी स्वत:ला घरात कोंडून घेतले. खिडकीतूनच त्या शेजा-यांशी संवाद साधत. फक्त भाऊ येताच दरवाजा उघडत असे. अशातच आईचे निधन झाले. तरीही ३ दिवस मुलगी मृत आईशी संवाद साधत होती.
संशयास्पद खुणा आढळल्या नाहीत
तीन दिवस मुलगी मृत आईशी संवाद साधत असल्याची माहिती समोर आली. या घटनेने सर्वांनाच सुन्न केले. घटनास्थळी कुठल्याही संशयास्पद खुणा आढळून आलेल्या नसून अधिक तपास सुरू असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक भारत भोईटे यांनी दिली. सोमवारी सहाच्या सुमारास त्यांच्या घरातून दुर्गंधी येत असल्याची माहिती विनोबा भावे नगर पोलिसांना मिळाली. घटनेची वर्दी लागताच पोलीस तेथे धडकले. त्यांनी दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला. मात्र ‘आई झोपली आहे, आवाज करू नका, भाऊ आल्याशिवाय दरवाजा उघडणार नाही,’ असे तिने पोलिसांना ठणकावून सांगितले.पोलिसांनी भावाला बोलावून घेतले. अग्निशमन दलाचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी दरवाजा तोडला. तेव्हा साबीर यांचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला.
