सेक्सला नकार, फेसबुक फ्रेंडने घेतला जीव

फेसबुकवरून झालेली मैत्री जीवावर बेतल्याचा प्रकार रविवारी नालासोपारा येथे घडला. वाशीला राहणारी एक २० वर्षीय युवती एका २५ वर्षीय मित्राला भेटायला गेली. तिचा मृतदेह सायंकाळी युवकाच्या इमारतीत जिन्यावर आढळला.

अंकिता मोरे असं या युवतीचं नाव आहे. हरिदास निरगुडे याच्याशी अंकिताची अलिकडेच फेसबुकच्या माध्यमातून मैत्री झाली होती. या मैत्रीतून ती निरगुडेला भेटायला गेली. ‘शारीरिक संबंधांसाठी तिनं नकार दिल्याने तिला ठार केलं,’ अशी कबुली निरगुडेनं तुळींज पोलिसांना दिली आहे.

नालासोपारा पूर्वेला अलकापुरी भागातील तानिया मोनार्क या चार मजली इमारतीत हरिदास निरगुडे तळमजल्यावर राहतो. इमारतीत राहणाऱ्या एका रहिवाशाने अंकिताचा मृतदेह सुमारे ७.१५ वाजता तळमजल्याशेजारच्या जिन्यावर पाहिला. पोलिसांना बोलावण्यात आलं. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच अंकिताला मृत घोषित करण्यात आलं होतं. या मुलीला इमारतीतले रहिवासी ओळखत नव्हते, मात्र काहींनी तिला तळमजल्यावरील फ्लॅटमध्ये शिरताना पाहिलं होतं. इमारतीला सीसीटीव्ही कॅमेरा नव्हता.

पोलिसांना निरगुडेच्या फ्लॅटमध्ये बेडवर रक्ताचे डाग आढळले. निरगुडेने बुटाच्या लेसने अंकिताचा गळा आवळला होता. अंकिताचा मोबाईल आणि पर्स निरगुडेच्याच फ्लॅटमध्ये आढळली. निरगुडेने गुन्ह्याची कबुली दिली.

अंकिताची आणि निरगुडेची काही महिन्यांपूर्वी फेसबुकवर मैत्री झाली. दोघंही मेसेजच्या माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात होते. दोघं एकमेकांना आवडू लागली. रविवाली अंकिता घरी कोणालाही न सांगता निरगुडेला भेटायला नालासोपाऱ्याला आली. निरगुडे बहीणीसोबत या फ्लॅटमध्ये राहतो. बहिण घरात नव्हती. त्याने अंकिताला घरी बोलावले. शारीरिक संबंधांसाठी बळजबरी केली. तिने नकार दिला तेव्हा तिचा गळा आवळला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *