स्तनपान हा प्रत्येक बाळाचा आणि त्याच्या मातेचा मुलभूत मानवी हक्क असूनही आणि आधुनिक वैद्यकशास्त्रही स्तनपानाचा आग्रही पुरस्कार करू लागले असताना, गर्दीपासून दूर जाऊन आपल्या
नऊ महिन्यांच्या मुलीला स्तनपान देणाऱ्या एका मातेस, एका लोकप्रिय डिपार्टमेंटल स्टोअरमधून, सक्तीने बाहेर हाकलून दिल्याची घटना पुढारलेल्या ब्रिटनमध्ये घडली आहे.
चार मुलांची आई असलेल्या कॅरोलिन स्टॉर्मर या महिलेच्या बाबतीत हा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. लिचेस्टर परगण्यातील ‘प्रायमार्क’ या अग्रगण्य डिपार्टमेंटल स्टोअरच्या सुरक्षा रक्षकाने स्तनपान करणाऱ्या मुलीस हिसकावून घेतले व कॅरोलिनला स्टोअरबाहेर काढले. कॅरोलिनने या प्रकाराची पोलिसांतही रीतसर फिर्याद नोंदविली आहे. स्तनपानाचा पुरस्कार करणाऱ्या ‘फ्री टू फीड’ या फेसबूकवरील सपोर्ट ग्रुपवर कॅरोलिनने आपला हा अनुभव पोस्ट केल्यापासून
टीकेचे मोहोळ उठले आहे. कॅरोलिनच्या पतीने स्टोअरच्या व्यवस्थापनाकडे तक्रार केल्यावर ‘प्रायमार्क’ने सारवासारव केली. टीकेची दखल घेऊन स्टोअरच्या व्यवस्थापनानेही फेसबूकवर पोस्ट टाकले. त्यात त्यांनी म्हटले की, आमच्या स्टोअरमध्ये माता आपल्या मुलांना अगदी खुशाल स्तनपान देऊ शकतात. या घटनेची आम्ही चौकशी करीत आहोत.
कॅरोलिनने तिच्या फेसबूक पोस्टमध्ये विषद केलेला सर्व घटनाक्रम स्टोअरमधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही अगदी स्पष्टपणे टिपला गेला आहे. त्याच्या साह्याने पोलिसही तपास करीत आहेत.

