हिला पाहून ‘परी कल्पना’ विसरून जाल!

बालपणी परीकथा ऐकताना त्यातील परी दिसते कशी, अशा कल्पना प्रत्येकानं रंगवल्या असतील. अत्यंत नाजूक दिसणारी, मोहक रूप असणारी, मनोहारी पंख असणारी अशीच ‘परी कल्पना’ प्रत्येकानं रंगवली असेल. परंतु, परीकथेच्या सगळ्या गोंडस कल्पनांना छेद देणारी ‘परी’ अभिनेत्री अनुष्का शर्मानं आपल्या चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांसमोर आणलीय. तिच्या आगामी ‘परी’ या हॉररपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आलाय.

बॉलिवूडमध्ये एरव्ही बबली गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या अनुष्काचा वेगळाच अंदाज या ट्रेलरमध्ये पाहायला मिळतो. रक्त साखळलेले डोळे असणारी, खिडकीबाहेर उलटी लटकणारी, भिंतीवर चालणारी ही ‘परी’ पाहताना थरकाप उडल्याशिवाय राहणार नाही. अनुष्कानं तिच्या या भूमिकेसाठी घेतलेली मेहनत ट्रेलरमध्ये सहज पाहायला मिळतेय. अनुष्काचे चाहते ट्रेलर पाहूनच तिचं भरभरून कौतुक करतायेत. त्यामुळं परीचा हा ट्रेलर काही मिनिटांतच ट्रेंड होऊ लागलाय. अनुष्काच्या चाहत्यांप्रमाणे विराट कोहलीनंदेखील हा व्हिडिओ ट्विट केलाय. आपल्या लाडक्या पत्नीचा हा अवतार पाहून खुद्द विराटदेखील अवाक् झाल्याचं त्यानं ट्विट करत कबूल केलंय.

‘परी’ अनुष्का शर्माच्या ‘क्लीन स्लेट फिल्म्स’ या प्रोडक्शन हाउसचा तिसरा चित्रपट आहे. ही ‘परी’ येत्या २ मार्चला प्रेक्षकांना भेटायला येणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *