रशियाची राजधानी मॉस्कोजवळ रविवारी एक स्थानिक प्रवासी विमान कोसळले. यामध्ये रशियाच्या ७१ नागरीकांचा मृत्यू झाला आहे.
सुत्रांच्या माहितीनुसार, रशियाची डोमेस्टीक विमान कंपनी असणाऱ्या सारातोव एअरलाईन्स कंपनीचे एंतोनोव एन-१४८ या विमानाने दोमोदेदोवो विमानतळावरुन उड्डाण केले होते. ते ओर्स्क येथे निघाले होते. या विमानात ६५ स्थानिक प्रवासी आणि ६ विमान कर्मचारी उपस्थित होते.
विमान कंपनीने या वृत्ताला पुष्टी दिली असून विमानाचा एक भाग पूर्णपणे उध्वस्त झाल्याचे विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. दरम्यान, रशियाच्या आणीबाणी मंत्रालयाने दुर्घटनास्थळी एक पथक रवाना केले आहे. वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, अरुगुनोवो गावातील प्रत्यक्षदर्शींनी पेटते विमान आकाशातून कोसळताना पाहिल्याचा दावा केला आहे.
दरम्यान, अद्याप ही दुर्घटना कशामुळे घडली याची माहिती मिळू शकलेली नाही. माध्यमांच्या माहितीनुसार, रशियाचे परराष्ट्र मंत्रालय या घटनेच्या अनेक शक्यता पडताळून पाहत आहे. खराब हवामान आणि पायलटच्या चुकीमुळे ही दुर्घटना घडली असावी अशी शक्यता मानून या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
