अमेरिकेत गोळीबारात भारतीयाचा मृत्यू, एक जखमी

अमेरिकेतील जॉर्जिया येथे माथेफिरुने केलेल्या गोळीबारात ४४ वर्षीय भारतीयाचा मृत्यू झाला आहे. या घटनेत आणखी एक भारतीय वंशाचा नागरिक जखमी झाला असून हल्ल्यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जॉर्जिया राज्यातील बर्नेट फेरी रोड येथे हाय टेक क्वीक स्टॉप येथे परमजित सिंग काम करत होते. परमजित यांना दोन लहान मुलं आहेत. सिंग काऊंटरच्या मागे कामात व्यस्त असताना लॅमर निकोल्सन (२८) हा दुकानात शिरला. त्याने बंदुकीने दुकानात गोळीबार केला. यात परमजित यांचा मृत्यू झाला. यानंतर हल्लेखोर तिथून गेला. याच रस्त्यावरील आणखी एका दुकानात हल्लेखोराने गोळीबार केला. गोळीबारानंतर त्याने दुकानातील रोख रक्कमही चोरली. यात भारतीय वंशाचा पार्थी पटेल (२७) हा गंभीर जखमी झाला. पोलिसांनी त्याला रुग्णालयात दाखल केले आहे. परमजित सिंग हे आठ वर्षांपूर्वी कामानिमित्त अमेरिकेत स्थायिक झाले होते.

पोलिसांनी गोळीबार करणारा हल्लेखोर लॅमर निकोल्सन याला अटक केली आहे. त्याच्यावर हत्या, चोरी, हल्ला करणे अशा विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनास्थळावरुन सीसीटीव्ही फुजेट गोळा केले आहेत. हल्लेखोराने दुकानात प्रवेश केला. त्याने सिंग यांच्यावर तीन गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितले. हल्लेखोराने पहिल्या दुकानात चोरी केलेली नाही. दुसऱ्या दुकानातून त्याने चोरी केली. या हल्ल्यामागचे नेमके कारण काय, हल्लेखोराला मानसिक आजार होता का याचा तपास सुरु आहे. हल्लेखोराला यापूर्वीही एका किरकोळ स्वरुपाच्या गुन्ह्यात अटक झाली होती, असे सूत्रांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *