आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या तिस्ता सेटलवाड यांच्या मुंबईतील निवासस्थानी आज (मंगळवार) केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अधिकाऱ्यांनी छापा टाकला.
गेल्या आठवड्यात सीबीआयने तिस्ता सेटलवाड व त्यांच्या संस्थेविरोधात गुन्हा दाखल केला होता. परदेशातून मिळत असलेल्या आर्थिक मदतीबाबत त्यांच्या संस्थेने आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणी केंद्रीय गृह मंत्रालयाकडून परवानगी घेण्यात आली होती.
मुंबईतील जुहू भागात असलेल्या तिस्ता सेटलवाड यांच्या घरावर सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी छापा टाकला. कागदपत्रांबाबत अद्याप काही खुलासा सीबीआयकडून करण्यात आलेला नाही. दरम्यान, तिस्ता सेटलवाड यांनी आपल्यावरील सर्व आरोपांचे खंडन केले आहे.

