भररस्त्यात मुलींची छेड काढणाऱ्या मद्यपी पोलिसाला मुलींने आणि इतर लोकांनी चप्पलेचा मार दिल्याची घटना हरयाणामध्ये घडली. हरयाणामधल्या हिस्सार भागात ही घटना घडली असून संबधित पोलिसाला मारहाण करण्यात आल्याच इतर पोलिसांनीही कबुल केलं आहे. हा पोलीस कामावर दारू पिऊन आला होता. मद्याच्या प्रभावाखाली या पोलिसानं रस्त्यावरील मुलीची छेड काढली. पोलिसाच्या कृत्यामुळे संतापलेल्या या मुलीनं पोलिसाला धडा शिकवला.
पोलिसांने मद्यप्राशन केलं असून त्यानं मुलीची छेड काढण्याचा प्रयत्न केला आहे हे कळताच आजूबाजूच्या परिसरातील लोकांनी या पोलिसाला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली इतकंच नाही तर त्याचा चप्पलेचा चोपही दिला. लोकांचा आक्रोश पाहता या पोलिसाला शेवटी माफी मागावी लागली. पण, कायद्याचे रक्षकच भक्षक बनतात त्यावेळी मात्र नाईलाजानं इथल्या लोकांनी कायदा हातात घेत या पोलिसाला चांगला धडा शिकवला.
संबधीत पोलिसाचं नाव योगेश कुमार असल्याचं समजत आहे. पोलिसांनी महिलेची छेड काढल्याची ही घटना दुर्दैवी असून या पोलिसावर कारवाई करण्यात येईल असे आश्वासन हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहर लाल खट्टर यांनी दिले.
