मशिन बंद करा…

राजेशकडून घड्याळ, सोन्याची चेन जमा केली, मात्र त्याला ऑक्सिजनचा सिलिंडर नेताना कुणीही अडवले नाही. मशिनकडे ओढला जात असताना ‘मशिन बंद करा’, अशी अस्फुट किंकाळी त्याच्या तोंडातून बाहेर पडली, ती शेवटचीच. सगळा खेळ एका मिनिटात संपला होता. आत्ताही राजेशची दोन तुटलेली बोटं तशीच मशिनला चिकटलेली आहेत…’ शोकसंतप्त मारू कुटुंबीय सांगत होते.

या प्रकरणानंतर रुग्णालय प्रशासनाने राजेशनेच आतमध्ये जाण्याचा निर्णय़ घेतल्याचा दावा रुग्णालय प्रशासनाने केला असला तरी हा प्रकार घडला तेव्हा तिथेच असलेल्या राजेशच्या मोठ्या बहिणीच्या पतीने, हरीश सोलंकी यांनी नेमके काय झाले ते सांगितले.

एमआरआय करायला जाण्यापूर्वी हरिश सोलंकी, राजेश व काकांची मुलगी प्रियांका सोलंकीही त्या विभागाबाहेर थांबले होते. वॉर्डबॉयकडे दागिने, घड्याळ जमा केले, आत जाताना रुग्णाला ऑक्सिजनची गरज लागेल असे सांगून एमआरआय मशिन बंद असल्याचे त्याने सांगितले. त्याच वेळी प्रियांकाने घड्याळ व दागिने चालत नाही मग सिलिंडर कसा चालेल? असा प्रश्न विचारून वॉर्ड बॉयचे नावही विचारले. त्यावर त्याने उद्धटपणे तुला काय करायचे, असे सांगून वेळ मारून नेली. मशिनच्या दिशेने सिलिंडरसह ओढला जातोय हे लक्षात येताच राजेश ओरडला, पण तोपर्यंत मशिनने त्याला खेचले होते. हरिश यांनी कर्मचाऱ्यांच्या मदतीने त्याला बाहेर ओढून काढण्याचा आटापिटा केला. पण अखेर राजेश बाहेर आला तो फुगलेल्या आणि डोळे बाहेर आलेल्या अवस्थेत!

राजेश याच्या मोठ्या बहिणीने मनिषानेही उद्विग्नपणे दोषींना कडक शिक्षा व्हायलाच हवी, असे सांगितले. पैसा असलेले जामिनावर सुटतात, उजळ माथ्याने फिरतात. पण ज्याने माझ्या भावाला मृत्यूच्या दाढेमध्ये ढकलले, त्यांना या बहिणीचे दुःख कळणार का, असे सांगून त्या ढसढसा रडू लागल्या. मारू कुटुंबीयांच्या दुःखाला ठिगळ लावता येणार नाही, राजेशचे वयोवृद्ध आईवडिल त्याचा जवळ असलेला फोटो पाहून ओक्साबोक्सी रडत होते, मदतीला धावलेल्या तर देवही वाचवतो, माझ्या राजेशला त्याने का ओढून नेलं, हा काळीज चिरत जाणारा त्यांचा आर्त सवाल ऐकून गर्दीच्याही अश्रूंचा बांध फुटला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *