अनाथांनाही मिळणार आता सरकारी नोक-यांमध्ये आरक्षण

राज्यातील अनाथ मुलांना शासकीय नोक-यांमध्ये खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. अनाथ मुलांचे पुनर्वसन आणि त्यांचे भवितव्य सुरक्षित करण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला. एमपीएससी परीक्षेत पास होऊनही खुल्या प्रवर्गात दाखविली गेल्याने, अनुत्तीर्ण ठरविण्यात आलेल्या अमृता करवंदे या तरुणीने ‘अनाथांची जात कोणती?’ असा आर्त सवाल थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काही दिवसांपूर्वी केला होता.

बालगृहातील व इतर अनाथ मुलांपैकी महिला व बाल कल्याण विभागाकडून देण्यात येणारे प्रमाणपत्र असलेली मुलेच आरक्षणासाठी पात्र असतील. शासन निर्णय लागू झाल्याच्या दिनांकापासून पुढे होणा-या सरळसेवा भरतीसाठी आजचा निर्णय लागू राहील. मात्र, जी भरती प्रक्रिया या आधी सुरू झाली आहे, त्यास हे आरक्षण लागू होणार नाही, असे महिला व बाल कल्याणमंत्री पंकजा मुंडे यांनी सांगितले. अनाथ ही एक स्वतंत्र जात मानून त्या प्रवर्गास २ टक्के आरक्षण हे मागासवर्गीयांमधून द्यावेत, असा प्रस्ताव राज्य मागासवर्ग आयोगाने पूर्वी दिलेला होता. तथापि, कोणत्याही प्रवर्गाची जात ठरविणे आणि त्या आधारे आरक्षण देणे हे राज्य सरकारच्या अखत्यारित येत नाही. तरीही अनाथांना आरक्षण द्यायचे, अशी आग्रही भूमिका घेत, मुख्यमंत्र्यांनी अनाथांना खुल्या प्रवर्गात १ टक्के समांतर आरक्षण देण्याचा निर्णय घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *