आईच्या मदतीने पतीवर ब्लेडने वार

सासूने मुलीच्या मदतीने जावयावर हेक्सा ब्लेडने वार करून जखमी केले. भोसरी येथील इंद्रायणीनगर येथे मंगळवारी (१६ जानेवारी) सकाळी ही घटना घडली.
नारायण मोहन तावरे (वय ३०, रा. इंद्रायणीनगर ,भोसरी) असे जखमी पतीचे नाव असून, त्याने भोसरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या प्रकरणी पत्नी आरती नारायण तावरे (२६, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी) हिला पोलिसांनी ताब्यात घेतले असून, सासू सुमन हरिदास बोबडे पसार आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण व त्याची पत्नी आरती गेल्या काही महिन्यापांसून विभक्त झाले आहेत. त्यामुळे मुलांसह आरती तिची आईकडे बालाजीनगर झोपडपट्टीत राहात होती. नारायण सकाळी मुलांना भेटण्यासाठी सासरी गेले असताना त्यांच्यात वाद झाले.

या वेळी सासूने नारायण यांना धरून ठेवले; तर आरतीने हेक्सा ब्लेडने नारायण यांच्या छातीवर वार केले. नारायण यांच्यावर वायसीएम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणी भोसरी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, फौजदार भालेराव तपास करीत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *