वांद्रे येथील रंगशारदा सभागृहात रविवारी गणेशोत्सव समन्वय समिती, शिवसेना नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत बोलताना उद्धव ठाकरे यांनी गणेशोत्सवाला विरोध करणाऱ्यांवर तसेच त्याविरोधात न्यायालयात जाणाऱ्यांवर जोरदार हल्ला चढवला. हिंदूंच्या सणांच्या विरोधात हिंदूच न्यायालयात जातात; मात्र मशिदीवरील भोंग्यांविरोधात कोणीही न्यायालयात जात नाही. त्याचा त्रास इतरांना होत नसेल का? ते भोंगे उतरवण्यात दिरंगाई का होते? असे प्रश्न उपस्थित करत “विघ्नांना घाबरू नका, शिवसेना तुमच्या पाठीशी आहे,‘ अशी ग्वाही त्यांनी दिली. गणेशोत्सव समन्वय समितीच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी राहणार असल्याचे आणि समितीला कार्यालय मिळवून देण्याचे आश्वासनही त्यांनी दिले. या वेळी उद्धव यांनी “मंगलमूर्ती, मंगल परिसर‘ या योजनेची घोषणाही केली.
गणेशोत्सवातच विघ्ने आणली जातात. उत्सव मंडळांना विरोध करणाऱ्यांनी त्यांच्या सामाजिक कामाकडे पाहावे, असा सल्ला उद्धव यांनी दिला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपण वटहुकूम काढण्याची मागणी केली असल्याची माहिती त्यांनी दिली. रेल्वे बॉम्बस्फोटाला नऊ वर्षे झाली; पण त्याचा निकाल लागला नाही; मात्र गणेशोत्सवाशी संबंधित याचिकांचा निकाल तत्काळ लागतो. हा अतिरेक्यांचा, दाऊदचा सण नाही तर हिंदूंचा उत्सव आहे. तो कोणत्याही परिस्थितीत दणक्यातच साजरा होणार, असे त्यांनी ठासून सांगितले.
घाणेरड्या प्रथा बंद करा
उत्सव दणक्यात झाला पाहिजे; पण विसर्जनाच्या मिरवणुकीत होणारे विभत्सक आणि घाणेरडे प्रकार बंद झाले पाहिजेत. दुसऱ्यांनी सांगण्याआधी आपणच मर्यादा ठरवल्या पाहिजे, असा सल्लाही त्यांनी गणेश मंडळांना दिला.
लोकमान्य टिळकांनी जनजागृतीसाठी गणेशोत्सव सुरू केला. सध्याही गणेशोत्सवातून जनजागृतीची गरज आहे. आता कोणत्या जनजागृतीची गरज आहे, हे कार्यकर्त्यांनी, नगरसेवकांनी ओळखा, असे सांगत त्यांनी भाजपविरोधात आक्रमक होण्याचा सल्ला दिला.
मुंबई – दिल्ली 100 मिमी पावसात तुंबते. दिल्ली महापालिका कोणाच्या ताब्यात आहे माहिती नाही. तेथे नाले असतील नसतील; पण नालायक नक्कीच आहेत, अशी टीका करून काहींना स्वबळाची खुमखुमी आली आहे; पण महाराष्ट्र कोरडा पडलाय त्यावर बोलायला कोणी तयार नाही, अशा शब्दांत शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नाव न घेता भाजपवर हल्ला चढवला.
राजकारणातील डास मारतो
महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी डासांपासून होणाऱ्या आजारांबाबत सादरीकरण केले. तेव्हा ठाकरे म्हणाले की, महापालिका प्रत्येक ठिकाणी पोहोचणे शक्य नाही. तुम्ही त्यांच्यासोबत जा. तुम्ही मुंबईतील मच्छर मारा, मी राजकारणातील मारतो.

