येत्या१५ वर्षात राज्यातील ८० हजार शाळा बंद करण्याचं सरकारचं कोणतंही उद्दिष्टं नसून या सर्व अफवा आहेत. त्यावर विश्वास ठेवू नका, असं स्पष्टीकरण राज्याचे शालेय शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज दिलं.
विनोद तावडे यांनी टि्वटरवरून हे स्पष्टीकरण दिलं. येत्या १५ वर्षांत राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचे शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे, असं मत शिक्षण विभागाच्या प्रधान सचिवाने व्यक्त केलं नसल्याचा दावाही त्यांनी केला. शाळा बंद करण्याचं सरकारचं कोणतंही धोरण नाही, असं सांगत या अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
शिक्षण विभागातील अधिकारी, केंद्रप्रमुखांच्या बैठकीसाठी शिक्षण विभागाचे प्रधान सचिव नंदकुमार रविवारी औरंगाबादमध्ये आले होते. यावेळी सरकारी शाळांबाबतच्या मुद्द्यावर त्यांनी सरकारची आगामी वाटचाल स्पष्ट करताना राज्यातील ८० हजार सरकारी शाळा बंद करून ही संख्या ३० हजारांवर आणण्याचे शिक्षण विभागाने उद्दिष्ट ठेवले आहे, असं मत व्यक्त केलं होतं. त्याबाबतच्या बातम्या प्रसिद्ध झाल्याने तावडे यांनी टि्वट करून खुलासा केला आहे.
