विनयभंग केल्याचा आरोप
येथील एका सेवानिवृत्त पोलीस उपनिरीक्षकाला सात ते आठ महिलांनी मारहाण केल्याची घटना जिल्हा व सत्र न्यायालयाच्या परिसरात घडली. एका महिलेने पत्ता विचारल्यावर या अधिकाऱ्याने तिचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. बळीराम राठोड असे मारहाण झालेल्या माजी पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे.
बळीराम राठोड हे जिल्हा परिषद कार्यालयासमोर एका चहाच्या टपरीवर उभे असताना वडाळी परिसरातील काही महिला त्यांच्याकडे आल्या. त्यांनी एका महिला वकिलाचा पत्ता विचारला. त्यानंतर या महिलांसोबत बाचाबाची झाली. यावेळी बळीराम राठोड यांनी एका महिलेचा हात पकडल्याचा आरोप आहे. अचानकपणे या महिलांनी राठोड यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर परिसरात बघ्यांची एकच गर्दी जमली. न्यायालयाच्या समोर हा मारहाणीचा प्रकार घडला. काही नागरिकांनी बळीराम राठोड यांना फ्रेझरपुरा पोलीस ठाण्यात नेले. पण, घटनास्थळ हे गाडगेनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येत असल्याने नंतर त्यांना ऑटोरिक्षात बसवून गाडगेनगर पोलीस ठाण्यात आणण्यात आले. महिलांनी त्यांच्या विरोधात तक्रार नोंदवली. बळीराम राठोड हे न्यायालयात शपथपत्र बनवण्यासाठी आले होते. नोटरींना भेटून ते जिल्हा परिषद कार्यालयासमोरील चहा टपरीवर पोहोचले, तेव्हा ही घटना घडली. अमरावती शहरातील अवैध व्यवसाय बंद करण्यासाठी बळीराम राठोड हे गेल्या अनेक दिवसांपासून लढा देत आहेत. शहरातील मटका व्यवसाय बंद झाला पाहिजे, अशी त्यांची मागणी आहे. त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष होत असल्याने कंटाळून स्वत: बळीराम राठोड यांनीच निषेध म्हणून मुख्यमंत्री, गृहराज्यमंत्री आणि पोलीस आयुक्तांकडे मटका व्यवसाय सुरू करण्याची मागणी केली होती, त्यामुळे ते वादात सापडले. त्यांच्या पाठपुराव्यानंतर पोलीस प्रशासनाने कारवाई करताना शहरातील मटका अड्डय़ांवर छापे टाकले होते. या मारहाणीचा या प्रकाराशी काही संबंध आहे, का याचीही चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.
बळीराम राठोड यांनी देखील महिलांच्या विरोधात तक्रार केली आहे. आपण चहा टपरीवर उभे असताना एका महिलेने महिला वकिलाचा पत्ता विचारला. त्यानंतर महिलेने भांडण सुरू केले आणि विनाकारण आपल्याला या महिलेसोबतच्या इतर महिलांनी मारहाण केली आणि ऑटोत बसवून पोलीस ठाण्यात नेले. महिलांनी त्यांच्या जवळील मोबाईल आणि रोख रक्कमही काढून घेतल्याचे त्यांचे म्हणणे आहे. गाडगेनगर पोलिसांनी या प्रकरणी चौकशी सुरू केली आहे.
