मुंबईतील कांदिवली समतानगरचे शिवसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची रविवारी रात्री चॉपरने वार करून निघृण हत्या करण्यात आली. सावंत रात्री आपल्या मित्रांना भेटून घरी परतताना त्यांच्यावर हा हल्ला करण्यात आला. इमारतीखाली हे अज्ञात हल्लेखोर गाडीत लपून बसले होते. या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस मारेकऱ्यांचा शोध घेत आहेत.
सावंत हे रात्री ११ च्या सुमारास आपल्या मित्रांना भेटून घरी परतत असताना त्यांच्यावर हा हल्ला झाला. समतानगरमधील त्यांच्या इमारतीखाली हे हल्लेखोर गाडीत लपून बसले होते. सावंत इमारतीखाली पोहोचताच या अज्ञात हल्लेखोरांनी त्यांना गाठले आणि त्यांच्यावर चॉपरने वार केले अशी माहिती पोलिसांनी दिली. त्यांना उपचारासाठी त्वरीत जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तत्पूर्वीच सावंत यांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, इमारतीतील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेतला जात आहे.
