विमानात तरुणीवर लैंगिक अत्याचार, अमेरिकेत भारतीयाला अटक

अमेरिकेत विमान प्रवासादरम्यान महिला प्रवाशावर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी भारतीयाला अटक करण्यात आली आहे. प्रभू राममूर्ती (३४) असे या भारतीयाचे नाव असून तो गेल्या अडीच वर्षांपासून अमेरिकेत आयटी कंपनीत प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून काम करत आहे.

गुरुवारी राममूर्ती आणि त्याची पत्नी विमानाने लास वेगासवरुन डेट्रॉइटला जात होते. विमानात राममूर्तीच्या एका बाजूला २२ वर्षांची तरुणी होती. तर दुसऱ्या बाजूला त्याची पत्नी होती. पीडित तरुणीचा प्रवासादरम्यान डोळा लागला. याचाच फायदा घेत राममूर्तीने तिच्यावर अत्याचार केला. राममूर्तीच्या कृत्यामुळे पीडितेला जाग आली. तिने तातडीने विमानातील केबिन क्रू सदस्यांना घडलेला प्रकार सांगितला. त्यांनी पीडितेला विमानात दुसऱ्या ठिकाणी बसायला जागा दिली. विमान लँड होताच पोलिसांनी राममूर्तीला अटक केली.

राममूर्ती पीडितेवर अत्याचार करत असताना त्याची पत्नी बाजूलाच बसली होती. त्यामुळे तिच्या भूमिकेवरही पोलिसांनी संशय व्यक्त केला आहे. राममूर्तीची पत्नी पतीची  बाजू घेत आहे किंवा तिला या प्रकरणाची काहीच माहिती नसावी. मात्र राममूर्ती आणि त्याच्या पत्नीच्या जबाबात तफावत येत असल्याचे पोलिसांनी सांगितले.

स्पिरीट एअरलाईन्सच्या प्रवक्त्यांनी या वृत्तावर प्रतिक्रिया दिली आहे. आम्ही या प्रकरणात तपास यंत्रणांना सहकार्य करत असल्याचे एअरलाईन्सच्या वतीने सांगण्यात आले. विमान लँड होण्याच्या ४० मिनिटे अगोदर पीडित तरुणीने आम्हाला घडलेला प्रकार सांगितला. ती रडत होते. ती घाबरली होती, अशी माहिती विमानातील कर्मचाऱ्यांनी पोलिसांना दिली. तर दुसरीकडे राममूर्तीने हे आरोप फेटाळले आहेत. मला बरे वाटत नव्हते, मी गोळी घेतल्याने गाढ झोपेत होतो, मला या बाबत काहीच माहित नाही, या घटनेशी माझा काहीच संबंध नाही, असे राममूर्तीचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *