जम्मू- काश्मीरमधील बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी घडवलेल्या स्फोटात पोलीस दलातील चार जवान शहीद झाले आहेत. यात एक जवान गंभीर जखमी झाला असून जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर येथे दहशतवाद्यांनी शनिवारी सकाळी स्फोट घडवला. आयईडीद्वारे हा स्फोट घडवण्यात आला. हा स्फोट इतका भीषण होता की तीन जवानांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर एका जवानाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. स्फोटात परिसरातील काही दुकानांचे नुकसान झाले आहे. सोपोरमध्ये छोटा बाजार आणि बडा बाजारला जोडणारा रस्ता असून तिथेच दहशतवाद्यांनी हा स्फोट घडवला. बारामुल्ला जिल्ह्यात फुटिरतावाद्यांनी बंदची हाक दिली आहे. या पार्श्वभूमीवर गस्त घालणाऱ्या पोलिसांच्या पथकांना दहशतवाद्यांनी लक्ष्य केले. स्फोटात जखमी झालेल्या जवानावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे. तर हुर्रियत नेते मिरवाइज उमर फारुख यांनी देखील हल्ल्याचा निषेध केला आहे. शहीद झालेल्या जवानांची ओळख पटली आहे. यामध्ये सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक इरशाद, एम. अमिन, गुलाम रसूल आणि गुलाम नवी यांचा समावेश आहे. तीन दिवसांपूर्वी सोपेर येथेच दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात २५ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाला होता.
