पाणीपुरवठा १५ दिवसातून एकदा बंद ठेवण्याचा निर्णय- ठाणे महापालिका

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये  महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणारा पाणीपुरवठा यापुढे १५ दिवसातून एकदा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार येत्या शुक्रवारी २४ तासांसाठी कळवा, विटावा, दिवा, मुंब्रा, कौसा या उपनगरांसह ठाणे शहराच्या काही भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागण्याची चिन्हे आहेत.

ठाणे महापालिका विविध स्रोतांमार्फत पाणी उचलून त्याचे शहरातील वेगवेगळ्या भागात नियोजन करते. महापालिका क्षेत्रामध्ये महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडूनही ११० दशलक्ष लिटर इतका पाणीपुरवठा करण्यात येतो. त्यासाठी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ जिल्यातील बारवी धरणामधून पाणी उचलते. बारवी धरणातील पाणीसाठी जुन महिन्यापर्यंत पुरविण्यासाठी लघुपाटबंधारे विभागाने १५ टक्के पाणीकपात लागू केली आहे. या निर्णयाची अंमलबजावणी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने येत्या शुक्रवारपासून सुरू केली असून यापुढे दर १५ दिवसातून एकदा बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे या विभागाकडून शहरातील काही भागांना होणारा पाणीपुरवठा गुरुवारी रात्री १२ ते शुक्रवार रात्री १२ वाजेपर्यंत बंद राहणार आहे.

या कालावधीत कळवा काही भाग, विटावा, मुंब्रा, दिवा, शीळ, कौसा, डायघर, देसाई, इंदिरानगर, रुपादेवीपाडा, वागळे फायर ब्रिगेड, बाळकुम पाडा क्रमांक १ या ठिकाणचा पाणीपुरवठा २४ तास पूर्ण बंद राहणार आहे. या शटडाऊनमुळे पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असून नागरिकांनी पाण्याचा योग्य तो वापर करण्याचे आवाहन  ठाणे महापालिकेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *