राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते वसंत डावखरे यांचे निधन

ऱाष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विधानपरिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे आज बॉम्बे हॉस्पिटलमध्ये दीर्घ आजाराने निधन झाले, ते ६८ वर्षांचे होते. राष्ट्रवादी काँग्रेसची यामुळे मोठी हानी झाली आहे. डावखरे हे एक बहुआयामी व्यक्तीमत्व म्हणून ओळखले जात होते.

ठाणे जिल्ह्यातील मोठे नेते म्हणून डावखरे यांची ख्याती होती. हिवरे गावचे सरपंच त्यानंतर १९८६ साली ठाणे महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून त्यांच्या राजकीय कारकिर्दीला सुरुवात झाली. त्यानंतर राजकीय क्षेत्रात त्यांनी आपल्या दखलपात्र कामगिरीनुसार ठसा उमटवला होता. १९८७मध्ये ते ठाण्याचे महापौर झाले होते. त्यानंतर १९९२ पासून चार वेळा ते विधानपरिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. सर्वच पक्षातील नेत्यांशी त्यांचा चांगला सुसंवाद होता. अत्यंत मितभाषी स्वभावाचे ते होते. त्यांच्या जाण्याने राष्ट्रवादीचेच नव्हे तर समाजाचे मोठे नुकसान झाल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली आहे.

२० नोव्हेंबर रोजी बॉम्बे हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आले होते. हृदयाचा त्रास आणि मूत्रपिंड निकामी झाल्याने ते त्रस्त होते. रुग्णालयात दाखल केल्यानंतर प्रकृती अधिकच खालावल्याने त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते.  अखेर गुरुवारी त्यांची प्राणज्योत मालवली.

वसंत डावखरे यांचा अल्पपरिचय :

वसंत डावखरे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. पुढे शिक्षणासाठीही त्यांना मोठा संघर्ष करावा लागला. महाविद्यालयीन जीवनापासूनच त्यांचा राजकारणाशी संबंध आला.  हिवरे गावचे सरपंच ते विधान परिषदेचे उपसभापती हा त्यांचा राजकारणातील प्रवास आहे.

१९८६ साली ठाणे महापालिकेची स्थापना झाली. त्यानंतर पहिल्याच निवडणुकीत ते नौपाड्यातून काँग्रेसचे नगरसेवक म्हणून विजयी झाले. १९८६-८७ साली ते ठाणे महापालिकेत विरोधी पक्षनेते होते. त्यानंतर ते ठाण्याचे महापौरही झाले.

१९९२ पासून सलग चारवेळा ते विधान परिषदेवर आमदार म्हणून निवडून गेले. १९९८ मध्ये विधान परिषदेच्या उपसभापतीपदी त्यांची एकमताने निवड झाली. त्यानंतर सलग १८ वर्षे ते उपसभापती होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *