पब, कॅफे उघडताना नियम पायदळी; पालिकेचे दुर्लक्ष

कमला मिल कम्पाऊंडमधील दोन रेस्टोपब भस्मसात होऊन १४ जणांना प्राण गमवावे लागल्यानंतर महापालिकेने मुंबईतील असे पब, हॉटेल, मॉल यांच्यासह शेकडो अनधिकृत बांधकामांवर तातडीने हातोडा चालवला. मात्र मुळातच मुंबईतील बंद पडलेल्या गिरण्यांच्या जमिनींवर पब, हॉटेल, कॅफे, मॉल आदींचे बांधकाम करताना विकास नियंत्रण नियमावलीचे मोठ्या प्रमाणावर उल्लंघन झाले असून याकडे राज्य सरकार व मुंबई महापालिकेकडून कानाडोळा केला जात आहे. महापालिका व अग्निशमन दलाचे नियमही पायदळी तुडवण्यात आले आहेत, त्याकडे आजवर सोयीस्करपणे दुर्लक्ष करण्यात आले.

लोअर परळ येथील फिनिक्स मिल, कमला मिल, रघुवंशी मिल, एम्पायर डाइंग आदी गिरण्यांच्या जागेवर मोठ्या प्रमाणात विकास नियंत्रण नियमावली पायदळी तुडवून पब, हॉटेल व मॉल उभारण्यात आले आहेत. मुंबई महापालिका व राज्य सरकारकडे याबाबतच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. मात्र त्यांना केराची टोपली दाखवली जाते. फिनिक्स मिल, रघुवंशी मिल, एम्पायर डाइंग आदी गिरण्यांच्या जमिनीवर जुन्या बांधकामात फेरबदल करून मॉल, मल्टिप्लेक्स, पब, रेस्टोपब, हॉटेल आदी उभारण्यात आले आहेत. यापैकी अनेक बांधकामे करताना महापालिका व नगरविकास खात्याची परवानगी घेतलेली नाही. गिरण्यांच्या जमिनीचा विकास करताना नागरिकांसाठी मोकळ्या जागा ठेवणे बंधनकारक आहे. मात्र तेथेही दुकाने, कॅफे, फूड जॉईंट आदी बेकायदेशीरपणे उभारले आहे. काही महिन्यांत यात वेगळवेगळे बदल केलेले आहेत. मात्र महापालिका, अग्निशमन दल व संबंधित विभागाकडून यावर कोणतेही नियंत्रण नाही. फिनिक्स मिलमध्ये तर एक पंचतारांकित हॉटेल उभारताना एफएसआयचा गोलमाल करण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *