कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीसोबतच्या पाकिस्तानातील भेटीसंदर्भात गुरूवारी परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी राज्यसभेत सरकारची भूमिका मांडली. यावेळी सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानवर जोरदार टीका केली. पाकिस्तानने या भेटीच्यावेळी कुलभूषण जाधव यांच्या आई व पत्नीला सुरक्षेच्या कारणास्तव कपडे बदलायला सांगितले. कुलभूषण जाधव यांच्या आईला साडी नेसायचीच सवय असूनही त्यांना बळजबरीने सलवार-कुर्ता परिधान करायला सांगण्यात आले. तसेच त्यांना मंगळसूत्र, टिकली आणि बांगड्याही काढून ठेवायला सांगितल्या. त्यामुळे जेव्हा या दोघी कुलभूषण जाधव यांच्यासमोर गेल्या, तेव्हा कुलभूषण यांनी त्यांच्या आईला बाबा कसे आहेत? हा पहिला प्रश्न विचारला. आईच्या कपाळावर टिकली आणि गळ्यात मंगळसूत्र नसल्यामुळे आपल्या वडिलांचे काही बरे-वाईट झाल्याची शंका कुलभूषण जाधव यांच्या मनात उत्त्पन्न झाल्याचे, सुषमा स्वराज यांनी सांगितले. माणुसकीचा दाखला देत पाकिस्तानने या भेटीचा डंगोरा पिटला असला तरी या भेटीत माणुसकी आणि सद्भावना यापैकी कशाचाही पत्ता नव्हता, अशी टीका सुषमा यांनी केली.
