ट्राफिक सिग्नल्सवर फळविक्रेते, भिकारी, फेरीवाले पहिले असतील मात्र पनवेल परिसरात सध्या सिग्नलवर वाहतूक कोंडीचा फायदा घेत चक्क गुटखा, सिगारेटची पाकिटे विकली जात आहेत. यामध्ये विमल, आरएमडी, गोवा गुटख्याचा समावेश असून याची दुपटीने विक्री केली जात आहे. नव्याने स्थापन झालेल्या पनवेल महानगरपालिकेने दारूबंदीची स्वप्ने पनवेलकरांना दाखवल्यानंतर दुसरीकडे पनवेल, कळंबोली, कामोठेसारख्या भागात गुटखा विक्री केली जात आहे. कोणत्याही कारवाईला न भिता गुटखाविक्री करणाऱ्यांना कोणाचे पाठबळ मिळत आहे का असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पनवेल-मुंब्रा महामार्गावरील सिग्नलवर सध्या गुटखाविक्री होत आहे. सिग्नल पडल्यानंतर लागणाऱ्या लांब रांगांचा फायदा घेत सायंकाळच्या वेळेस ट्रक ट्रेलर व लहान-मोठय़ा वाहनांना गुटखाविक्री केली जाते. कळंबोली फुडलँड सिग्नलच्या परिसरात हा प्रकार सर्वाधिक सुरू आहे. या चौकाच्या ४०० मी. अंतरावर पश्चिमेस पोलीस मुख्यालय असूनही सर्रासपणे गुटखाविक्री करण्यात येत आहे.
पनवेल भागात असलेली शहरांमधील छोटी दुकाने तसेच हॉटेलबाहेरील पानपट्टय़ांवर जोरदार गुटखा विक्री केली जात आहे. आता या प्रकारावर प्रशासन कारवाई करणार की नाही, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
अन्न व औषध प्रशासनाच्या माध्यमातून नेहमी कारवाई केली जाते, मात्र लवकरच संबंधित प्रकारावर लक्ष ठेवून योग्य अशी दखल घेतली जाईल.
