आठ वर्षांच्या मावळ्याने केला लिंगाणा सुळका सर

पुण्यातील अवघ्या आठ वर्षांच्या साई कवडे याने लिंगाणा सर करण्याची किमया करून दाखवली आहे. विशेष म्हणजे हा पराक्रम करताना साईने छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा केली होती. रायगड, राजगड आणि तोरणा किल्याच्या मध्यभागी लिंगाणा सुळका आहे. लिंगाण्याची उंची ३ हजार १०० फुट इतकी आहे. या सुळक्यावर चढाई करणे अत्यंत कठीण समजले जाते. मात्र, साईने ही सर्व आव्हाने यशस्वीरित्या पेलत दोन दिवसांत लिंगाण्याची चढाई पूर्ण केली. साई हा पुण्याच्या बालेवाडी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिकत आहे. चार वर्षांचा असल्यापासून त्याने गिर्यारोहणाला सुरूवात केली. आतापर्यंत त्याने शिवनेरी, रायगड, राजगड, तोरणा, कलावंतीण, प्रतापगड, सिंधुदूर्ग, विजयदुर्ग, देवगड, कुलाबा यासह एकूण ६८ किल्ले सर केले आहेत. यातील बहुतांश किल्ले हे चढाईसाठी अत्यंत कठीण आहेत. परंतु इच्छाशक्ती आणि जिद्दीच्या जोरावर साईने लिंगाणा सर करण्याची किमया करून दाखवली.

९ डिसेंबरला साईने लिंगाणा सुळका चढायला सुरूवात केली. यावेळी साईचे वडील सुधीर कवडे आणि गिर्यारोहक अनिल वाघ हे दोघेजण त्याच्यासोबत होते. ९ डिसेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत साईने अर्धी चढाई पूर्ण केली. त्यानंतर रात्रभर तिघांनी विश्राम केला. अखेर दुसऱ्या दिवशी पहाटे साईने पुन्हा लिंगाणा चढायला सुरूवात केली. सकाळी ९ वाजता त्याने लिंगाणा सर केला. इतक्या कमी वयात गडकिल्ले सर करणाऱ्या साईच्या कामगिरीने अनेकांना थक्क केला आहे. साईने गडकिल्ल्यांच्या भ्रमंतीची शंभरी गाठण्याचा निश्‍चय केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *