मीरा रोडमध्ये सराईत गुन्हेगाराला अटक
मीरा रोडच्या शीतलनगर भागात एका घरात चोरी केल्याप्रकरणी अस्लम इस्राएल शेख याला अटक करण्यात आली. विशेष म्हणजे शेख हा उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यातील रामपूर राजवाडी या गावचा माजी सरपंच आहे. तो मुंबईत येऊन घरफोडय़ा करत असल्याचे उघडकीस आले आहे.
शीतलनगरमध्ये राहणाऱ्या उषा पुत्रन या आपल्या आईच्या घरी गेलेल्या असताना २२ नोव्हेंबरला त्यांच्या घरात चोरी झाली होती. या वेळी चोरटय़ाने घरातील ३० हजार रुपयांची रोख रक्कम, ८६ ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असा सव्वादोन लाख रुपयांचा ऐवज आणि दोन एटीएम कार्ड चोरून नेली. या एटीएम कार्डच्या आधारे बँक खात्यातून ५० हजार रुपये काढण्यात आले. पैसे काढल्याचा संदेश पुत्रन यांच्या मोबाइलवर आल्यानंतर त्या तातडीने घरी परतल्या. त्या वेळी घरी चोरी झाल्याचे त्यांना समजले.
मीरा रोड पोलीस ठाण्यात त्यांनी तक्रार दाखल केल्यानंतर वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीकांत पाडुळे यांच्या नेतृत्वाखाली साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, उपनिरीक्षक भरत सोनवणे, विजय ब्राह्मणे आणि निकम यांनी तपास सुरू केला. चोरटय़ांनी दहिसर येथील एटीएम केंद्रातून हे पैसे काढल्याचे समजले. पोलिसांनी एटीएम केंद्रात लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले, तेव्हा दोघे जण एका कारमधून आले असल्याचे दिसून आले, परंतु दोघांचे चेहेरे स्पष्ट झाले नाहीत. त्यामुळे दहिसर चेकनाक्यावर लावलेल्या सीसीटीव्हीचे फुटेज तपासले, तेव्हा या कारचा क्रमांक पोलिसांना मिळाला. या क्रमांकाच्या आधारे पोलीस मुंबईतील वडाळा येथे राहणाऱ्या आसिफ नावाच्या व्यक्तीपर्यंत पोहोचले. आसिफच्या उलटतपासणीत आसिफने अस्लम इस्राएल शेख याने कार खरेदीसाठी पैसे दिले असून ही गाडी अस्लम चोऱ्या करण्यासाठी वापरत असल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर पोलिसांनी नाटय़मयरीत्या अस्लमचा पाठलाग करत त्याची धरपकड केली.
विशेष म्हणजे चोरी केल्यानंतर अस्लम विमानाने उत्तर प्रदेशमधील गावी परत जात असे. यासाठी तो विमानाची तिकिटे आगाऊ काढून ठेवत असे. चोरलेल्या ऐवजाचा वापर अस्लम निवडणुकीसाठी तसेच मालमत्ता खरेदीसाठी वापरत असे. अस्लम २०१० मध्ये आपल्या गावचा सरपंच बनला होता. त्यानंतरही त्याने मुंबई, नवी मुंबई, वसई-विरार परिसरांत घरफोडय़ा केल्या होत्या. त्या वेळी २०१४ मध्ये नवी मुंबईत एका पोलिसाच्या घरी केलेल्या चोरीच्या प्रकरणात अटक करण्यात आली. त्यानंतर पालघर पोलिसांनी त्याला गेल्या वर्षी उत्तर प्रदेश पोलिसांच्या मदतीने अटक केली होती. काही दिवसांपूर्वीच तो जामिनावर बाहेर आला होता.
धरपकड अशी झाली..
गेल्या १५ ते २० दिवसांपासून पोलीस अस्लमच्या पाळतीवर होते, परंतु तीन ते चार वेळा पोलिसांना गुंगारा देण्यात तो यशस्वी झाला. अखेर सोमवारी त्याची गाडी पोलिसांना मुंबईतील वडाळा येथे दिसून आली. पोलीस त्याच्या गाडीजवळ पोहोचले त्या वेळी गाडीत फक्त त्याचा चालक होता. याच वेळी जवळपास असलेल्या अस्लमने पोलिसांना पाहिले आणि त्याने टॅक्सी पकडून कुल्र्याच्या दिशेने पलायन केले. ही गोष्ट समजल्यावर पोलिसांनी टॅक्सीचा पाठलाग सुरू केला आणि रस्त्यातच टॅक्सी अडवली. पोलीस पकडणार हे समजल्यावर अस्लमने चालत्या गाडीतून उडी मारून पळायला सुरुवात केली, परंतु पोलीस पथकातील निकम यांनी त्याचा जोरदार पाठलाग केला आणि अस्लमची गठडी वळली.
