पत्नीच्या चारित्र्यावर संशय; ‘बिकिनी’वरून रस्त्यावर फिरवलं

चीनमध्ये एका जोडप्यामध्ये वाद किळसवाण्या पद्धतीनं ‘रस्त्यावर’ आला… आणि भल्याभल्यांना लाजेनं मान खाली घालावी लागलीय.

चीनमधल्या जियांजी प्रांतात राहणाऱ्या जैंगला (३७) पत्नी वांग नी (३०)  हिच्या चारित्र्याबद्दल संशय होता. वांग नी हिचे परपुरुषाशी संबंध आहेत, या शंकेवरून जैंगनं आपल्या पत्नीला कपडे उतरवून रस्त्यावर फिरवलं. केवळ बिकीनीवर आपल्या पत्नीला जैंगनं चीनच्या रस्त्यांवरून फिरण्यास भाग पाडलं. इतकंच नाही तर तिच्या गळ्यात ‘मला माझे शरीर विकायचे आहे’ अशी पाटीही त्यानं लटकावली होती. ज्या दिवशी हा प्रसंग घडला तेव्हासुद्धा जैंग दारूच्या नशेत होता.

हे प्रकरण सोशल मीडियावरून पसरल्यानंतर मात्र जैंगची जगभर छी थू होतेय. हे प्रकरण पोलिसांकडे गेल्यानंतर जैंग दररोज दारू पिऊन आपल्या पत्नीला मारझोड करत असल्याचं समोर आलंय.

जैंग आणि वांग नी यांना दोन मुली आहेत. या प्रकरणानंतर जैंगने वांगची माफीही मागितलीय… इतकच  नाही तर त्याचा हा माफीनामा चीनच्या सगळ्या वृत्तपत्रांमध्ये छापून आलाय.

पण, जैंगनं कितीही माफी मागितली तरी वांग नी हा प्रसंग आपल्या संपूर्ण आयुष्यात तरी विसरू शकेल का? हा प्रश्न आहेच. पती-पत्नीमधील भांडणं काही नवीन नाही. पण चीनमधील हा प्रकार मात्र फारच किळसवाणा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *