अनिकेत कोथळेची मुलगी दत्तक घेणार!
सांगली येथे अनिकेत कोथळे यांना पोलिसांनी मारहाण केल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणामुळे पोलीस विभागाची प्रतिमा डागळली. त्यावर राज्यभर चर्चा गाजत असताना हिंगोली येथील पोलीस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी अनिकेत कोथळे यांची ३ वर्षांची मुलगी प्रांजल हिला दत्तक घेऊन तिच्या पालकत्वाची संपूर्ण जबाबदारी स्वीकारली आहे. तिच्या कुटुंबाकडून तशी सहमती मिळाली आहे. यानिमित्ताने एका महिला पोलीस अधिकाऱ्याचे असेही मातृत्व पुढे आले आहे.
हिंगोली येथील पोलीस उपअधीक्षक सुजाता आबासाहेब पाटील यांनी अनिकेत कोथळे यांची तीन वर्षांची मुलगी प्रांजल या लहान मुलीचे पालकत्व मिळावे याकरिता विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र विश्वास नांगरे पाटील यांना १६ नोव्हेंबर रोजी पत्र लिहिले. या पत्रात मुलीच्या शिक्षणाची पूर्ण जबाबदारी व येणारा खर्च मी माझ्या वेतनातून करू इच्छिते, याकरिता मुलीचे पालकत्व मिळण्याकरिता संबंधितांकडून योग्य प्रयत्न होण्यासाठी कळविण्याची विनंती केली होती. इतकेच नाही तर सुजाता पाटील यांनी कोथळे कुटुंबाशी आधीच संपर्क साधला असता त्यांनीसुद्धा प्रांजल हिला देण्याची सहमती दर्शवली आहे. एकूणच हा प्रकार लक्षात घेता या प्रकारामुळे पोलीस विभागाची प्रतिमा उंचावत असल्याचे दिसते. सुजाता पाटील यांच्या निर्णयाचे जिल्ह्यत सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
या घटनेत एक कुटुंब उद्ध्वस्त झाले. अनिकेतची पत्नी अत्यंत कमी वयात असताना तिच्यावर आलेल्या या दुर्दैवी प्रसंगामुळे मानवतेची भावना लक्षात घेऊन तिच्या मुलीचे पालकत्व स्वीकारण्याचा प्रयत्न आहे. माझ्या वेतनातून त्या मुलीचे संपूर्ण शिक्षण, विवाहासह सर्व खर्च करून तिचे भवितव्य उज्ज्वल करण्याचा प्रामाणिक प्रयत्न राहणार आहे.
– सुजाता पाटील, उपअधीक्षक, हिंगोली.
