सारंगखेडय़ाचे अश्वसंग्रहालय देशातील सर्वाधिक सुंदर आणि जागतिक आकर्षणाचे केंद्र होईल, तसेच दोन वर्षांत चेतक महोत्सवही आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचेल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.
शहादा तालुक्यातील सारंगखेडा येथे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते देशातील पहिल्या अश्वसंग्रहालयाचे भूमिपूजन झाले. या वेळी आयोजित सभेत मुख्यमंत्र्यांनी सारंगखेडा यात्रेच्या नियोजनाचे आणि अश्वबाजाराचे कौतुक केले. पर्यटनाच्या माध्यमातून नंदुरबारसारखा आदिवासीबहुल जिल्हा पर्यटनाच्या नकाशावर आणण्याचे काम राज्य सरकारकडून केले जाणार असल्याची ग्वाहीही त्यांनी दिली. सारंगखेडय़ात होत असलेले अश्वसंग्रहालय सुंदर बनविणार असून त्यात अश्वांविषयी सर्व माहिती असणार आहे. संग्रहालय आणि अश्वबाजाराच्या पाश्र्वभूमीवर येथे अश्वांसाठी रुग्णालय आणि प्रजनन केंद्र उभारण्यासाठी केंद्राकडे पाठपुरावा करण्यात येईल. देशात सध्या पर्यटनाच्या माध्यमातूनच अधिक रोजगारनिर्मिती होत असल्याने सारंगखेडा, प्रकाशा आणि तोरणमाळ या पर्यटन क्षेत्रांचा कायापालट करण्याचा विडा सरकारने उचलला आहे. सारंगखेडय़ातील चेतक महोत्सवाच्या माध्यमातून पर्यटकांसाठी खास सुविधा उपलब्ध करून दिल्या असल्याचे मुख्यमंत्र्यांनी नमूद केले.
तोरणमाळसारख्या पर्यटन स्थळाचा विकास करू शकलो नाही, परंतु आदिवासी संस्कृतीविषयी पर्यटकांमध्ये असलेले आकर्षण लक्षात घेऊन नंदुरबारचे नाव पर्यटनाच्या नकाशावर पोहचविण्याचा सरकारचा ध्यास असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्र्यांनी जयकुमार रावल यांच्या कामाचे कौतुक करत पर्यटन विभागाची जबाबदारी ते उत्तम पद्धतीने हाताळत असून त्यांना पर्यटनविषयक दृष्टी असल्याची शाबासकी दिली.
नंदुरबारमधील उपसा सिंचन योजनांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी लवकरच बैठक बोलावण्यात येणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या सोबत यासंदर्भात चर्चा करून विशेष बाब म्हणून काही करता येईल काय, याची चाचपणी करणार आहे. तापीतील पाणी शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत कुठल्याही परिस्थितीत पोहोचविण्याचा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला.
प्रारंभी मुख्यमंत्री आणि पर्यटनमंत्री रावल यांनी सारंगखेडय़ातील चेतक महोत्सवात हजेरी लावली. त्यांनी अश्वांच्या विविध कसरतीही पाहिल्या. यानंतर अश्वबाजारात फेरफटका मारला.
