तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या मुलीचा मृतदेह नग्नावस्थेत सापडला घरच्याच शेतात

तीन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या सतरा वर्षीय तरूणीचा मृतदेह नग्नावस्थेत घरच्या शेतात सापडल्याची धक्कादायक घटना पुण्यातील धामणे गावात घडली आहे. तरूणीच्या मृतदेहाच्या बाजूला रक्ताने भरलेला दगडही सापडला आहे. मुलीवर लैंगिक अत्याचार करून दगडाने हत्या केली असावी, असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. सोमवारी दुपारी शेत नांगरण्यासाठी गेलेल्या मुलीच्या भावाला तिचा मृतदेह आढळून आला. शुक्रवारी पीडित तरूणी तिच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. तेव्हापासूनच ती बेपत्ता होती.

माझ्या मुलीने दहावीची परीक्षा दिली होती. परीक्षेनंतर ती मला शेतीच्या कामासाठी मदत करत होती. शुक्रवारी दुपारी साडे बारा वाजेपर्यंत ती आमच्यासोबत शेतात होती. नंतर कॉलेजमधील प्रवेशासंदर्भातील माहिती घेण्यासाठी ती तिच्या शाळेच्या मैत्रिणीला भेटायला गेली होती. त्यानंतर ती शेतात परतलीच नाही. आमच्या शेजाऱ्यांनी तिला संध्याकाळी साडेचार वाजेच्या सुमारास आमच्या घराच्याजवळ पाहिलं होतं. त्यानंतर तिला कुणीही पाहिलं नाही, अशी माहिती पीडित तरूणीच्या आईने दिली आहे.

शुक्रवारी पीडित मुलीच्या कुटुंबियांनी चाकण पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर चाकण पोलिसांनी अज्ञातांविरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. सोमवारी दुपारी साडेबारा वाजता पीडित तरूणीच्या भावाने तिचा मृतदेह पाहिला आणि आम्हाला याबद्दलची माहिती दिली. मृतदेहापासून 200 मीटर अंतरावर आम्हाला रक्ताने माखलेला दगड सापडला आहे. तरूणीवर लैंगिक अत्याचार करून तिची दगडाने हत्या केली असावी, असा आम्हाला संशय आहे, अशी माहिती चाकण पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरिक्षक मनोजकुमार यादव यांनी दिली आहे.

दरम्यान, तरूणीचा मृतदेह ससून हॉस्पिटलमध्ये पाठविण्यात शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *