करमाळ्यात शाळकरी मुलीच्या अपहरणाचा प्रयत्न फसला

शालेय विद्यार्थिनीने आरडाओरड, झटापट केल्याने तिच्या अपहरणाचा दोघा तरुणांचा प्रयत्न फसला. मंगळवारी सकाळी साडेआठच्या सुमारास करमाळा (जि. सोलापूर) येथे हा प्रकार घडला. याप्रकरणी दोघांविरुद्ध अपहरणाचा प्रयत्न, विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला असून, एकाला पोलिसांनी अटक केली आहे. सुनील सोमनाथ वाघमोडे (वय १९, सरपडोह ता. करमाळा) असे अटकेतील संशयिताचे नाव आहे. आणखी एका अनोळखी तरुणाचा पोलिस शोध घेत आहेत.

पीडित मुलगी (वय १३) सकाळी अण्णासाहेब विद्यालयाकडे निघाली होती. तेव्हा बसस्थानकाशेजारच्या महावितरण कार्यालयासमोर दोघे मोटारसायकल (एमएच १३ यू ५३४१) वर आले. त्यांनी तिला जबरदस्तीने गाडीवर बसवले. गाडी मौलालीमाळ दिशेने जाताना तिने आरडाओरडा करू नये म्हणून तोंड दाबून धरले. तिचा विनयभंग केला. मुलीने झटापट करत जोरात ओरडल्याने तिला कुटीर रुग्णालयाजवळ गाडीवरून उतरवले. या वेळी मुलीच्या ओळखीच्या व्यक्तीने मोटारसायकलवर मागे बसलेल्या सुनील याला पकडले. गाडी चालवणाऱ्याने पळ काढला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *