मृत माशांमुळे तलावाला दुर्गंधी

वसईतील महापालिकेच्या तलावाची दुरवस्था; निर्माल्य, कचरा टाकल्याने पाणी प्रदूषित

वसई-विरार महापालिकेचा वालीव येथील तलावातील पाणी प्रदूषित झाले असून त्यामुळे परिसरात मोठय़ा प्रमाणावर दुर्गंधी पसरली आहे. या तलावातील मासे मृत झाले असून, नुकत्याच झालेल्या छठपूजेच्या वेळी तलावात तेलाचे दिवे सोडल्याने माशांचा मृत्यू झाल्याचे पालिकेच्या वतीने सांगण्यात आले. या तलावाच्या सुरक्षेसाठी तिथे सुरक्षा रक्षक असण्याची गरज आहे, मात्र सुरक्षारक्षक नसल्याने तलावात कचरा टाकला जातो, कपडे धुतले जातात. त्यामुळे पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.

महापालिकेने शहरातील सर्व तलावांचे सुशोभीकरण करून तलावाभोवती जॉगिंग ट्रॅक आणि छोटे उद्यान विकसित केले आहे. या तलावांच्या देखभाल-दुरुस्तीचा ठेका हा स्थानिक महिला बचतगटाकडे देण्यात आलेला आहे. वसई पूर्वेच्या वालीवमधील पालिकेच्या तलावात गेल्या दोन दिवसांपासून भयानक दुर्गंधी येत आहे. या तलावातील शेकडो मासे मृत्युमुखी पडले असून ते तलावात तरंगत आहेत. प्रभाग समिती ‘जी’चे सभापती रमेश घोरकना यांनी तलावातील पाणी छठपूजेमुळे प्रदूषित झाल्याचे सांगितले. छठपूजेच्या वेळी शेकडो भाविकांनी तलावात सूर्याला अघ्र्य देताना तेलाचे दिवे सोडले होते. या तेलामुळे मासे मरण पावल्याचे म्हणाले. असाच प्रकार यापूर्वी सातिवली येथील तलावात झाला होता. यापुढे आम्ही तलावात छठपूजेसाठी बंदी घालणार असून भाविकांना कृत्रिम तलाव बांधून देणार असल्याची माहिती दिली. या तलावात सुरक्षा रक्षक नसतात. त्यामुळे तलावात कचरा टाकला जातो, तसेच परिसरातील रासायनिक कंपन्या आहेत. तेथील कामगार रसायनयुक्त कपडे या तलावात धुतात. त्यामुळे पाणी प्रदूषित झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

पापडखिंड तलावही प्रदूषित

विरार पूर्वेच्या पापडखिंड धरणातून विरार शहरात दररोज एक दशलक्ष लिटर पाणीपुरवठा केला जातो. मात्र या तलावातही हजारोंच्या संख्येने भाविक उतरून छठपूजा करतात. या छठपूजेमुळे तलावाचे पाणी प्रदूषित झाले असून पालिकेने पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले आहेत. सध्या या तलावातील पाणी नागरिकांना देणे बंद करण्यात आले आहे. काही महिन्यांपूर्वी नालासोपारा पूर्वेच्या आचोळ तलावातील मासेही अशाच पद्धतीने मृत्युमुखी पडले होते.

तलावातील मासे मरण पावल्याने दुर्गंधी पसरली होती, मात्र आम्ही त्वरित तलावाची स्वच्छता हाती घेतली असून मृत मासे बाहेर काढले जात आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *