राधेश्याम मोपलवार यांना क्लिन चिट ?

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना क्लिन चिट मिळण्याची शक्यता आहे. मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या वादग्रस्त ध्वनिफीत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिला असून यात ऑडिओ टेप्समध्ये छेडछाड केल्याचे म्हटले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोपलवार यांना दिलासा मिळाला आहे.

राधेश्याम मोपलवार यांच्या काही वादग्रस्त ध्वनिफिती आणि सीडी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात जाहीर केल्या होत्या. यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने गुरुवारी राज्य सरकारकडे अहवाल सादर केला. या अहवालात ऑडिओ टेप्समध्ये छेडछाड केल्याचा उल्लेख असल्याचे वृत्त ‘इंडियन एक्स्प्रेस’ने दिले आहे.

ऑडिओ टेप्समध्ये ज्या जमिनीबाबत चर्चा सुरु होती ती जमीन बोरीवलीत होती. समृद्धी महामार्ग भिवंडी ते नागपूरपर्यंत जाणार आहे. त्यामुळे बोरीवलीच्या जमिनीचा संबंधच येत नाही. ही ध्वनिफित अशा पद्धतीने ‘एडिट’ करण्यात आली की ते संभाषण समृद्धी महामार्गाबाबत सुरु आहे, असा समज होईल, असे अहवालात म्हटल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या ऑडिओ टेप्सची समितीने चौकशी केली. मात्र, मूळ टेप्स समितीच्या हाती लागलेल्या नाहीत, याकडेही एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.

विशेष म्हणजे ही ध्वनिफीत तयार करणाऱ्याला मोपलवार यांच्याकडून खंडणीची मागणी केल्याप्रकरणी ठाणे खंडणी विरोधी पथकाने गेल्या महिन्यात अटक केली होती. सतीश सखाराम मांगले, त्याची दुसरी पत्नी श्रद्धा मांगले अशी या आरोपींची नावे आहेत. हे ध्वनीफितीचे प्रकरण मागे घेण्यासाठी सतीश हा गेल्या काही दिवसांपासून दहा कोटी रुपयांची खंडणी मागून मोपलवार यांना धमकावित होता, असा आरोप होता. या पार्श्वभूमीवर समितीने दिलेल्या अहवालाला महत्त्व प्राप्त झाले आहे.  समितीने अहवाल दिल्यावर आता राज्य सरकार मोपलवार यांना पुन्हा सेवेत घेणार का असा याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मोपलवार आणि सतीष यांची ओळख कशी झाली  ?

मोपलवार आणि त्यांच्या पत्नीची घटस्फोट घेण्याची प्रक्रिया सुरु होती. त्यावेळेस पत्नीची माहिती मिळविण्यासाठी मोपलवार यांनी खासगी गुप्तहेर म्हणून सतीशला नेमले होते. तेव्हापासून या दोघांची ओळख झाली. त्याचाच फायदा घेऊन त्याने मोपलवार यांची एक ध्वनीफिती बनवून ती वृत्तवाहिन्यांना पुरवली होती, असे पोलीस तपासात समोर आले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *