महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे माजी व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांना क्लिन चिट मिळण्याची शक्यता आहे. मोपलवार यांच्या भ्रष्टाचाराबाबतच्या वादग्रस्त ध्वनिफीत प्रकरणाची चौकशी करणाऱ्या समितीने राज्य सरकारला अहवाल दिला असून यात ऑडिओ टेप्समध्ये छेडछाड केल्याचे म्हटले आहे. यामुळे मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे मोपलवार यांना दिलासा मिळाला आहे.
राधेश्याम मोपलवार यांच्या काही वादग्रस्त ध्वनिफिती आणि सीडी विरोधकांनी पावसाळी अधिवेशनात सभागृहात जाहीर केल्या होत्या. यानंतर राज्य सरकारने या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी निवृत्त मुख्य सचिव जॉनी जोसेफ यांच्या अध्यक्षतेखाली तीन सदस्यीय समिती नेमली होती. या समितीने गुरुवारी राज्य सरकारकडे अहवाल सादर केला.
ऑडिओ टेप्समध्ये ज्या जमिनीबाबत चर्चा सुरु होती ती जमीन बोरीवलीत होती. समृद्धी महामार्ग भिवंडी ते नागपूरपर्यंत जाणार आहे. त्यामुळे बोरीवलीच्या जमिनीचा संबंधच येत नाही. ही ध्वनिफित अशा पद्धतीने ‘एडिट’ करण्यात आली की ते संभाषण समृद्धी महामार्गाबाबत सुरु आहे, असा समज होईल, असे अहवालात म्हटल्याचे समजते. प्रसारमाध्यमांनी प्रसारित केलेल्या ऑडिओ टेप्सची समितीने चौकशी केली. मात्र, मूळ टेप्स समितीच्या हाती लागलेल्या नाहीत, याकडेही एका अधिकाऱ्याने लक्ष वेधले.
