बलात्कारातून गर्भवती राहिलेल्या १३ वर्षांच्या मुलीने उच्च न्यायालयात धाव घेत तिला २६व्या आठवडय़ात गर्भपात करण्यास परवानगी देण्याची विनंती केली आहे. न्यायालयानेही केईएम रूग्णालयातील डॉक्टरांच्या एका पथकाला या मुलीची वैद्यकीय तपासणी करून सोमवारी त्याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
गर्भपातास परवानगी द्यावी या मागणीसाठी या मुलीच्या वतीने तिच्या वडिलांनी केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती शंतनु केमकर आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्या वेळी या प्रकरणी वैद्यकीय गुंतागुंतीचा मुद्दा नाही. परंतु ही मुलगी बलात्कारातून गर्भवती राहिलेली आहे. शिवाय ती अवघ्या १३ वर्षांची आहे. त्यामुळे हे बाळ तिला नको असल्याचे तिच्या वकिलांच्या वतीने न्यायालयाला सांगण्यात आले.
बलात्कारातून झालेल्या बाळाला जन्म देणे आणि त्याला वाढवणे हेही तिला मानसिक आणि शारीरिकदृष्टय़ा त्रासदायक ठरू शकते, असा दावा करत गर्भपातास परवानगी देण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे सन्मानाने जगण्याचा अधिकार या मुलीला आहे. परंतु नको असतानाही बाळाला जन्म देणे हे घटनेने दिलेल्या तिच्या या अधिकाराचे उल्लंघन आहे, असा युक्तिवाद या मुलीच्या वतीने कांदिवलीस्थित या मुलीने नोव्हेंबरच्या पहिल्या आठवडय़ात पोटात दुखत असल्याची तक्रार केल्यानंतर आणि त्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आल्यावर ती गर्भवती असल्याचे उघड झाले होते.
