संपूर्ण राज्याला हादरवून सोडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि हत्या प्रकरणातील तिन्ही दोषींना नगरच्या सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डीतील १५ वर्षांच्या मुलीवरील बलात्कार आणि हत्याप्रकरणी जितेंद्र उर्फ पप्पू बाबुलाल शिंदे (२५), संतोष भवाळ (३०) आणि नितीन भैलुमे (२३) या तिघांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी सरकारी वकिलांनी केली होती. न्यायाधीशांनी अवघ्या काही मिनिटांतच शिक्षेची सुनावणी केली. न्यायाधीशांनी शिक्षा सुनावताच पीडित मुलीच्या आई-वडिलांना आपले अश्रू आवरता आले नाहीत. तिन्ही दोषींना बलात्कार व हत्येचा कट रचल्याप्रकरणी दोषी ठरवत फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. दरम्यान, शिक्षेची अंमलबजावणी त्वरीत व्हावी अशी इच्छा पीडितेच्या आईने केली.
कोपर्डीत राहणाऱ्या १५ वर्षांच्या मुलीची १३ जुलै २०१६ रोजी जितेंद्र शिंदे, संतोष आणि नितीन या तिघांनी बलात्कारानंतर हत्या केल्याची घटना घडली होती. या घटनेचे पडसाद राज्यभरात उमटले होते. नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी या मागणीसाठी मराठा समाजाच्या वतीने राज्यभरात मोर्चे काढण्यात आले होते. शनिवारी विशेष जिल्हा सत्र न्यायालयाच्या न्या. सुवर्णा केवले यांनी तिघाही आरोपींना दोषी ठरवले होते. दरम्यान तिन्ही आरोपींना शिक्षेविरोधात उच्च न्यायालयात धाव घेता येईल. तिथे त्यांना वकीलही मिळेल.
दरम्यान, न्यायालयाच्या आवारात पोलिसांनी कडक बंदोबस्त ठेवला आहे. निकालाच्या पार्श्वभूमीवर कोपर्डीत शुकशुकाट पसरला आहे. गावकरी निकाल ऐकण्यासाठी अहमदनगर जिल्हा सत्र न्यायालय परिसरात दाखल झाले आहेत. पोलीस प्रमुखांनी सुरक्षेचा आढावा घेतला.
गेल्या आठवड्यात भैलुमेचे वकील तसेच विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम युक्तिवाद केला. सुमारे सव्वातास युक्तिवाद सुरु होता. दोषींना मृत्युदंडाची शिक्षा व्हावी यासाठी निकम यांनी १३ कारणे दिली. जितेंद्रने पीडितेवर बलात्कार केला आणि तिची हत्या केली. बलात्कारानंतर जितेंद्रने त्याच्या साथीदारांना मिस कॉल दिला होता. घटना घडली तेव्हा हे दोघेही जवळच दबा धरुन बसले होते. संतोष भवाळ आणि नितीन भैलुमे हे पडद्यामागचे सूत्रधार आहेत. त्यांना फाशीची शिक्षा द्यावी, असे निकम यांनी न्यायालयात सांगितले. इंदिरा गांधींची हत्या आणि संसदेवरील हल्ला या प्रकरणांमध्ये सूत्रधारांना फाशीची शिक्षा झाली होती, याकडेही निकम यांनी लक्ष वेधले होते.
बचावपक्षाने केलेला युक्तिवाद
शिंदे याच्यावतीने वकील योहान मकासरे व भैलुमेच्यावतीने वकील प्रकाश आहेर यांनी युक्तिवाद करताना कमीत कमी शिक्षा देण्याची विनंती केली होती. आरोपी निर्दोष आहेत, खटल्यात प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नाही, १२० ब (कट कारस्थान रचणे) व १०९ (गुन्ह्य़ाला प्रोत्साहन देणे) हे कलम लागूच होत नाही. भैलुमे हा सराईत गुन्हेगार नाही, पूर्वी त्याच्यावर गुन्हेही दाखल नाहीत. तो बीएससीचे शिक्षण घेत आहे. तो दलित आहे. कुटुंबाचा आधार आहे. त्याची आई आजारी असते. तिच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया झाली आहे. वडील मजुरी करतात. त्यामुळे कमीत कमी शिक्षा करावी, असा युक्तीवाद आरोपीचे वकील आहेर यांनी केला. शिंदे याच्या वतीने युक्तिवाद करताना वकील मकासरे यांनी, ही घटना दुर्मिळात दुर्मीळ नाही, आरोपी तरुण आहे, गुन्हेगार नाही. त्याला पत्नी आहे, असे सांगत फाशीऐवजी जन्मठेपेची शिक्षा देण्याची विनंती केली होती.
या कलमांखाली ठरवले होते दोषी
न्यायालयाने आरोपींना भारतीय दंड विधानातील कलम ३०२ (हत्या), ३७६- २ ब (बलात्कार करुन जखमी करणे), १२० ब (फौजदारी स्वरुपाचा कट रचणे), १०९ (गुन्ह्याला प्रोत्साहन देणे), ३५४ (छेड काढणे), बालंकाचे लैंगिक अत्याचार प्रतिबंध कायदा कलम ६, ८, १६ अन्वये दोषी ठरवण्यात आले.
