…म्हणून मध्य प्रदेशमध्ये रात्री आठनंतर ‘क्लासबंदी’?

भोपाळमध्ये ३१ ऑक्टोबर रोजी शिकवणीवरून घरी येणाऱ्या विद्यार्थीनीवर झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर राज्यातील शिवराजसिंह चौहान यांचे सरकार एक अजब निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. क्लासवरून येताना ही घटना घडल्याचा संबंध लक्षात घेऊन मध्यप्रदेश सरकार खासगी कोचिंग क्लासेस तसेच खासगी शैक्षणिक संस्थांना रात्री आठ नंतर कोणताही वर्ग न भरवण्याची सक्ती करण्याचा विचार करत आहे. हा निर्णय म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर असाच प्रकार असल्याची टीका होऊ लागली आहे.

मध्यप्रदेशचे शालेय शिक्षण मंत्री दीपक जोशी यांनी या संदर्भात ‘पीटीआय’ वृत्तसंस्थेला माहिती दिली. आम्ही या संदर्भात लवकरच खासगी कोचिंग क्लासेस आणि शैक्षिणक संस्थांच्या संचालकांबरोबर बैठक घेणार असल्याचे जोशी यांनी सांगितले. ‘संध्याकाळी आठनंतर जे कोचिंग क्लासेस किंवा खासगी शिक्षण संस्था आपले वर्ग भरवतील त्या संस्थांना सर्व विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना सुरक्षितपणे घरी पोहचवण्याची जबाबादारी घ्यावी लागेल’, असेही जोशी म्हणाले.

सरकार विद्यार्थ्यांच्या सुरक्षेची सर्व जबाबादारी या खासगी संस्था आणि क्लासेसवर ढकण्याच्या तयारीत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे. स्मार्टफोनच्या मदतीने क्लासेसने आणि शिक्षण संस्थांनी मोबाईल अॅपच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवावी. रात्री आठनंतर विद्यार्थ्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवणे कठीण काम नसल्याचे मत सरकारी समितीने मांडले आहे. त्यासाठी संबंधित संस्थांनी विद्यार्थ्यांच्या हलचाली ट्रेस करण्यासाठी नवीन यंत्रणा उभारावी, असे आदेश देण्यात येणार असल्याचे जोशींनी सांगितले.

३१ ऑक्टोबर रोजी १९ वर्षीय मुलगी क्लासवरून घरी येताना चार नराधमांनी तिच्यावर सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे. या प्रकरणात हलगर्जीपणा कऱणाऱ्या दोन आयपीएस अधिकाऱ्यांसहित तीन पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून तीन पोलिसांना सेवेतून बडतर्फ करण्यात आले आहे. बलात्कार झाल्यानंतर पोलिसांकडे तक्रार नोंदवण्यासाठी गेलेल्या पिडीत मुलीला पोलिसांनी एका पोलीस ठाण्यातून दुसऱ्या पोलीस ठाण्यात जायला सांगितल्याने संबंधित अधिकाऱ्यांवर ही कारवाई कऱण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *