अल्पवयीन विद्यार्थिनीवर शिक्षकाचा बलात्कार

आपल्या शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा डोळा तिरळा आहे. त्यावर वैद्यकीय उपचार करून घेऊ, असे सांगत वैद्यकीय उपचाराच्या बहाण्याने संबंधित अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी त्याच शाळेतील वर्गशिक्षकाविरुद्ध पोलिसानी गुन्हा दाखल केला आहे. माळशिरस तालुक्यातील नातेपुते येथे ही घटना घडली.

रमेश बागडे असे या गुन्ह्य़ातील संशयित आरोपी शिक्षकाचे नाव आहे. या संदर्भात नातेपुते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित विद्यार्थिनी ही पळसमंडळ येथे एका शाळेत शिक्षण घेते. आरोपी शिक्षक बगाडे हा या विद्यार्थिनीचा वर्गशिक्षक आहे. पीडित विद्यार्थिनीचा एक डोळा तिरळा असल्याने बगाडे याने तिच्या डोळ्यावर वैद्यकीय उपचार करण्याच्या बहाण्याने मागील तीन वर्षांपासून तिच्याशी लगट केली होती. दरम्यान, शिक्षक बगाडेची बदली पिरळे येथील शाळेत झाली असताना देखील त्याने पीडित विद्यार्थिनीच्या नातेपुते येथील घरी पुन्हा वैद्यकीय उपचार करून घेण्याच्या बहाण्याने आला.

त्या वेळी घरात अन्य कोणी नसल्याचा लाभ घेत त्याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले. मात्र या घटनेनंतर पीडित मुलगी शाळेत जाऊन रडू लागली, तेव्हा शाळेतील शिक्षकांनी विचारणा केली असता पीडितेने शाळेच्या मुख्याध्यापकांना हकिकत सांगितली. मुख्याध्यापकांनी तातडीने तिच्या वडिलांना बोलावून घेऊन माहिती दिली असता अखेर या प्रकरणी तिच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *