मैदानी खेळांपासून दूर गेल्याने मुलींमध्ये आजार वाढले

मुलींच्या शरीरात वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर संप्रेरकांमध्ये बदल होतात. पौगंडावस्थेत या बदलांची सुरुवात होते. संप्रेरकांमध्ये असंतुलन निर्माण झाल्यास मुलींमध्ये आरोग्याच्या इतरही समस्या निर्माण होण्याची शक्यता असते. मैदानी खेळांपासून मुली दूर गेल्याने पौगंडावस्थेतील ५० टक्के मुलींमध्ये विविध आजार बळावत असल्याचे निदर्शनात येत आहे, असे प्रतिपादन स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. लक्ष्मी श्रीखंडे यांनी केले.

इंडियन मेडिकल असोसिएशनच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय निमॅकॉन परिषदेत पौगंडावस्थेतील मुलींमध्ये आढळणाऱ्या ‘पॉलिसिस्टक ओव्हेरियन सिंड्रोम’ (पीसीओएस) यावर त्या बोलत होत्या. डॉ. श्रीखंडे पुढे म्हणाल्या की, पीसीओएस ही संप्रेरकीय असंतुलनाची समस्या आहे. ती आजकाल सामान्य झाली आहे. बदलती जीवनशैली याचे मुख्य कारण आहे. यामुळे शरीरात चरबीचे प्रमाण वाढते. पुरुषांमध्ये आढळणारे टेस्टोस्टोरोन नामक संप्रेरकाचे प्रमाण वाढल्यास स्त्रियांच्या चेहऱ्यांवर, ओढांवर केस येण्यास सुरुवात होते. १८ ते ४४ वर्षे वयोगटातील ५ ते १० टक्के महिलांमध्ये पीसीओएस दिसून येतो. या आजाराची व्याख्या नेहमी बदलते. प्रत्येक १० पैकी एक महिलेत या आजाराची लक्षणे दिसून येतात. त्यात मुलींना झोप न येणे, झोपेत श्वास कोंडणे, मधुमेह आदींचा समावेश आहे. हल्लीच्या मुलींमध्ये मैदानी खेळ खेळण्याचे प्रमाण कमी आहे. त्याशिवाय व्यायामाचा अभाव, मोबाईल-लॅपटॉपवर जास्त वेळ घालवण्याची सवय आदी कारणेही पौगंडावस्थेत मुलींमध्ये आजार वाढवण्याला कारणीभूत आहेत.

पीसीओएस हा आजार पूर्णपणे बरा होत नसून त्यावर नियंत्रण ठेवता येते. त्याकरिता जीवनशैलीत बदल करणे, फास्ट फूड टाळणे, कमी कॅलरीचा आहार घेणे, नियमित व्यायाम करणे आदी उपाय आहे. मुलींना हा आजार होऊ नये म्हणून लहानपनापासून त्यांच्या पालकांनी मैदानी खेळ, आहारावर भर देण्याची गरज, डॉ. श्रीखंडे यांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *