एल्फिन्स्टन पुलावरील चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेला काल एक महिना पूर्ण झाला असताना एक मोठी आणि दिलासादायक घडामोड समोर आली आहे. एल्फिन्स्टन रोड, दादरसारख्या मुंबईतील गर्दीच्या स्टेशनांवर वेगाने पादचारी पूल बांधले जावेत, यासाठी आता लष्कराचे अभियंते रेल्वे प्रशासनाला मदत करणार आहेत. मुंबई भाजप अध्यक्ष आशीष शेलार यांनी याबाबत रेल्वे आणि संरक्षण मंत्रालयाशी संपर्क साधला होता. त्याला दोन्ही विभागांनी हिरवा कंदील दाखवला आहे.
आपत्कालीन परिस्थितीत युद्धपातळीवर पूल बांधण्याचं प्रशिक्षण मिलिटरी इंजिनीअरिंग विंगला दिलेलं असतं. राष्ट्रकुल स्पर्धेवेळी दिल्लीतील पूल पडला होता, तेव्हा या पथकानं तो झटपट बांधला होता. त्यासोबतच, नैसर्गिक आपत्तीच्या वेळी मदत आणि बचावकार्यातही त्यांनी झटपट पूल बांधून अडकलेल्यांची सुटका केल्याची अनेक उदाहरणं आहेत. ती लक्षात घेऊनच, एल्फिन्स्टन, दादर, बोरीवली, मुलुंड, ठाणे या स्टेशनांवर वेगानं पूल बांधण्यासाठी लष्कराने पुढाकार घ्यावा, असं आवाहन आशीष शेलार यांनी केलं होतं. त्यांनी संरक्षणमंत्री निर्मला सितारामन आणि रेल्वेमंत्री पियुष गोयल यांची भेट घेऊन त्यांना तशी विनंतीच केली होती. या दोघांनीही आपली सूचना मान्य केल्याचं ट्विट आशीष शेलार यांनी केलंय.
