आपण एखाद्या क्लबच्या बाहेर २० मिनिटे वाट पाहत उभे राहू शकतो, आवडत्या हॉटेलमध्ये जेवण्यासाठी अर्धा तास रांगेत उभे राहू शकतो. मग, ५२ सेकंदांच्या राष्ट्रगीतासाठी उभे राहण्यात काय कठीण आहे, असा सवाल भारताचा क्रिकेटपटू गौतम गंभीर याने विचारला आहे. गेल्या काही दिवसांपासून चित्रपटगृहांत राष्ट्रगीत सुरू असताना उभे राहायचे की नाही, या मुद्द्यावरून देशभरात वाद निर्माण झालेला आहे. या पार्श्वभूमीवर गौतम गंभीरने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही प्रतिक्रिया व्यक्त केली.
चित्रपटगृहांत राष्ट्रगीत वाजवले जात असताना उभे राहण्याची गरज नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केल्यानंतर आता पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले आहे. या वादात अनेक सेलिब्रिटींनी उडी घेतली असून त्यांच्यामध्ये दोन तट पडले आहेत. अभिनेता कमल हसन यांनी सार्वजनिक ठिकाणी राष्ट्रगीत वाजवण्याबद्दल नाराजी व्यक्त केली होती. देशभक्ती दाखवण्यासाठी कोणावरही दबाव आणणे किंवा त्यांच्या राष्ट्रभक्तीची परीक्षा घेणे योग्य नाही, असे त्यांनी म्हटले होते. तर अभिनेत्री सनी लिओनी आणि अरबाज खान यांनी मात्र राष्ट्रगीताच्या सन्मानार्थ थोडावेळ उभे राहण्यास काहीही हरकत नसल्याचे मत व्यक्त केले होते. एकुणच सध्या बॉलिवूडसह सर्वच क्षेत्रात याविषयी परस्परविरोधी मतं ऐकायला मिळत आहेत. दरम्यान, केंद्र सरकारला राष्ट्रगीत वाजवण्यासंबंधी नियम बदलायचे असतील तर ध्वजसंहिता बदलण्याचा विचार करावा, न्यायालयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून नेम साधू नये, असा सल्ला सर्वोच्च न्यायालयाने दिला होता. त्यामुळे आता सरकार काय भूमिका घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
