नागपूर शहरात स्वाईन फ्लू मृत्यूचे प्रमाण वाढत असतानाच डेंग्यूने तोंड वर काढले आहे. नागपुरात गेल्या दोन महिन्यात डेंग्यूचे ८७ रुग्ण आढळले असून महापालिकेने वेळीच लक्ष न दिल्यास ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वैद्यकीय क्षेत्रातील जाणकार व्यक्त करत आहेत.
शहराच्या अनेक भागात सध्या डेंग्यूसदृश्य आजाराचे रुग्ण मोठय़ा संख्येने आढळत आहेत. त्यातील काहींचा मृत्यूही झाला आहे, परंतु हे मृत्यू डेंग्यूचे नसल्याचा दावा आरोग्य विभागाने केला आहे.
आरोग्य विभागाच्या अहवालानुसार शहरात अद्याप डेंग्यूच्या एकाही मृत्यूची नोंद नाही. दुसरीकडे नातेवाईकांकडून मात्र खासगी रुग्णालयात डेंग्यूमुळे झालेले मृत्यू इतर आजाराने झाल्याचे दाखवले जात असल्याचा आरोप होत आहे. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार गेल्या १ जानेवारी ते २४ ऑक्टोबपर्यंत नागपुरात एकूण १०९ डेंग्यू रुग्णांची नोंद झाली. त्यातील ४३ रुग्ण हे सप्टेंबर आणि ४४ रुग्ण ऑक्टोबर महिन्यातील आहेत.
शहरात डेंग्यूचा प्रसार झपाटय़ाने होत असताना महापालिकेकडून काळजी घेतली जात नाही, असा नागरिकांचा आरोप आहे. ‘इडिस इजिप्ता’ आणि ‘एडिस अल्बोपिक्टस’ या मादी डासांच्या चाव्यामुळे डेंग्यू होतो. हा डास दिवसा सक्रिय असतो. महापालिकेकडून सध्या सर्वत्र डास शोधमोहीम सुरू आहे. डास आढळल्यास तातडीने उपाय केले जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. नागरिकांनी घराचा परिसर स्वच्छ ठेवण्यासह कुठेही पाणी साचणार नाही याची काळजी घ्यावी. त्यामुळे डेंग्यूवर प्रतिबंध घालणे शक्य आहे, असे महापालिकेच्या आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.
