‘ताजमहाल प्रेमाचे नव्हे, तर स्त्रीच्या अपमानाचे प्रतीक’

ताजमहालवरुन भाजपचे नेते वादग्रस्त विधाने करत असताना आता यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित संस्थेने उडी घेतली आहे. ‘ताजमहाल इतिहासाच्या दृष्टीकोनातून स्त्रीच्या अपमानाचे प्रतीक आहे,’ असे विधान अखिल भारतीय इतिहास संकलन योजनेचे संघटन सचिव बालमुकुंद यांनी केले आहे. ही संघटना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित आहे. ‘नवभारत टाईम्स’सोबत बोलताना बालमुकुंद यांनी ताजमहाल आणि त्यासंदर्भात सुरु असलेल्या वादावर भाष्य केले.

‘ताजमहाल ऐतिहासिकदृष्ट्या स्त्रीच्या अपमानाचे प्रतीक आहे. मात्र कलेच्या दृष्टीकोनातून पाहिल्यास, ताजमहाल ही वास्तू अतिशय महत्त्वाची आहे. त्यामुळेच आम्हाला त्याचा अभिमान वाटतो. ताजमहाल आपला वारसा असून त्याचे संरक्षण व्हायला हवे,’ असे बालमुकुंद यांनी म्हटले. ‘कलात्मकदृष्ट्या ताजमहाल देशाचा गौरव आहे. जगभरातील लोक ताजमहाल पाहण्यासाठी येतात. हजारो भारतीयांच्या कलेचे दर्शन ताजमहालमधून घडते. या वास्तूसाठी वापरण्यात आलेले संगमरवरदेखील भारतातीलच आहे. त्यामुळेच ताजमहालाचा सन्मान व्हायला हवा आणि त्याचे संरक्षणदेखील व्हायला हवे,’ असे ते म्हणाले.

जगभरात ताजमहाल प्रेमाचे प्रतीक म्हणून ओळखला जातो. ताजमहाल पाहायला येणारी दाम्पत्ये ताजमहालजवळ आवर्जून फोटो काढतात. मात्र बालमुकुंद यांनी ताजमहाल प्रेमाचे प्रतीक नसल्याचे मत व्यक्त केले. ‘ताजमहाल आपला वारसा आहे आणि जर कोणी ताजमहालला वारसा मानत नसेल, तर ते चुकीचे आहे. मात्र ताजमहाल प्रेमाचे प्रतीक नाही. ताजमहाल ही वास्तू स्त्रीच्या अपमानाचे प्रतीक आहे,’ असे बालमुकुंद यांनी म्हटले.

‘ताजमहाल प्रेमाचे प्रतीक असू शकत नाही. एखाद्या महिलेच्या पतीची हत्या करुन तिला उपभोग्य वस्तूसारखे वागवणे, १७ वर्षांमध्ये १४ मुले जन्माला घालणे, शेवटचे मूल जन्माला येताना महिलेला मरण येणे, त्या महिलेच्या मृत्यूनंतर चार महिन्यात तिच्या बहिणीसोबत लग्न करणे, याला भारतीय संस्कृतीच्या दृष्टीकोनातून प्रेम म्हणत नाहीत. त्यामुळे ताजमहाल प्रेमाचे प्रतीक होऊ शकत नाही. इतिहासाच्या दृष्टीने ताजमहाल स्त्रीच्या अपमानाचे प्रतीक आहे,’ असे मत बालमुकुंद यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *