खारघरमधील दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांपैकी एक पूर्णपणे बंद पडल्यामुळे सांडपाणी व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे. सांडपाणी रस्त्यांवर वाहत असून त्यामुळे दरुगधी पसरली आहे. गटारे साफ करण्यासाठी वापरण्यात येणारे एकमेव यंत्रही बंद पडले आहे. हे यंत्रे दुरुस्त करण्याऐवजी सिडकोच्या कामगारांनाच गटारात उतरून सफाई करण्यास भाग पाडत आहे.
खारघर सेक्टर-१५ आणि सेक्टर-९मध्ये प्रत्येकी एक सांडपाणी प्रक्रिया केंद्र आहे. त्यापैकी सेक्टर १५ मधील मुख्य केंद्र सुरू आहे, मात्र सेक्टर-९ येथील केंद्र दीड वर्षांपासून बंद आहे. सांडपाणी वाहिनीला गळती लागल्यामुळे आणि वीज नसल्यामुळे हे केंद्र बंद ठेवण्यात आले आहे. खारघर सेक्टर १, २, ८, ९ व १० मधील सांडपाणी व्यवस्थापनाची जबाबदारी सेक्टर-९मधील केंद्रावर आहे. या परिसरात अनेक गगनचुंबी इमारती आणि मॉल आहेत, मात्र या इमारतींत निर्माण होणारे सांडपाणी प्रक्रिया न करताच नाल्यात सोडले जात आहे.
खारघर शहरासाठी असलेले एकमेव सांडपाणी पंपिंग यंत्र देखभालीअभावी बंद पडून आहे. त्यामुळे शहरातील सर्व नाले भरले आहेत. सेक्टर-४ मधील नाल्याची सफाई करण्यासाठी आणि पाणी बाहेर काढण्यासाठी कर्मचारी नेमण्यात आले आहेत. सुरक्षेची कोणतीही काळजी न घेता, त्यांना नाल्यात उतरविले जात आहे. नाले संपूर्ण भरल्यामुळे कर्मचाऱ्यांना सांडपाण्याखाली जाऊन सफाई करावी लागत आहे. याबाबत संबंधित सिडको अधिकारी एस. बी. पाटील यांना विचारले असता त्यांनी या विषयावर बोलणे टाळले आहे.
बंद सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत पाठपुरावा करताना, हे केंद्र लवकरच सुरू करू व पम्पिंग यंत्राचीही दुरुस्ती करू, असे आश्वासन सिडकोने दिले आहे, अशी माहिती येथील रहिवासी अमर उपाध्याय यांनी दिली.
