वेतनवाढीच्या मागणीवरून राज्य परिवहन महामंडळाच्या (एसटी) कर्मचाऱ्यांनी पुकारलेल्या बेमुदत संपाला मध्यरात्रीपासून सुरूवात झाली आहे. कोल्हापूरात या संपाला हिंसक वळण मिळालं आहे. कागल बसस्थानकात पुणे-बेळगाव एसटीवर अज्ञातांकडून दगडफेक करण्यात आली आहे. तर बीडमधील अंबेजोगाईत परिवाहनमंत्री दिवाकर रावते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करण्यात आलं आहे.
ऐन सनासुदीत राज्यभर एसटी सेवा बंद झाल्याने राज्यभरात प्रवाशांचे हाल झाले आहेत. मुंबई, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, ठाणे, बीड यासरख्या शहरातील बस आगारातून एकही एसटी बाहेर पडलेली नाही. सर्व गाड्या आगारातच उभ्या आहेत. एसटी कर्मचारी आगारात जमले असून अनुचित प्रकार टाळण्यासाठी पोलीस देखील दाखल झाले आहेत.
आज पासून दिवाळीला सुरुवात झाली असून दिवाळीसाठी गावी जाण्यासाठी निघालेल्या प्रवाशांचे तर जास्तच हाल आहेत. ऐन दिवाळीत संप होणार नाही, रात्रीत काही तोडगा निघेल अशी प्रवाशांची अपेक्षा होती. त्यामुळे पहाटे निघणाऱ्या गाड्या पकडण्यासाठी काही जण आले होते. मात्र त्यांना रखडत बसावे लागले. इतर वेळी एस टी स्टँडच्या आवारात अनेक खासगी गाड्या प्रवाशांना आवाहन करत असतात. मात्र संपाच्या भीतीमुळे आज खासगी गाड्याही नसल्याचे प्रवाशांनी सांगितले.
