अंगणवाडी संपकाळात १२५ बालमृत्यू!

राज्यातील दोन लाख अंगणवाडी सेविकांनी पुकारलेल्या संपाच्या आजच्या १७ व्या दिवशीही लाखो बालकांना पोषण आहार मिळू शकलेला नाही. यामुळे गेल्या सतरा दिवसांत केवळ १६ आदिवासी जिल्ह्यंमध्ये १२५ बालकांचे मृत्यू झाले असून सुमारे अडीच हजार कुपोषित बालके आरोग्य विभागाच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. संप जेवढा लांबेल तेवढे बालमृत्यू वाढतील तसेच कुपोषित बालकांचा प्रश्न हाताळणेही अवघड जाईल, अशी भीती आता आरोग्य विभागातील ज्येष्ठ डॉक्टराकडून व्यक्त होत आहे.

राज्यातील ९७ हजार अंगणवाडय़ांमधून सुमारे ७३ लाख बालकांना पोषण आहार दिला जातो. यामध्ये उपमा व खिचडी अथवा शेंगदाण्याचे लाडू आदी पदार्थ दिले जातात. या पोषण आहाराबरोबरच या बालकांच्या आरोग्याची तपासणी करण्यात येऊन तीव्र कमी वजनाची व अतितीव्र कमी वजनाच्या बालकांना आरोग्य विभागाच्या माध्यमातून उपचार करण्यात येतात. त्याचप्रमाणे सुमारे तीन लाख गर्भवती मातांच्या आरोग्याची तपासणीही या अंगणवाडय़ांमध्ये होत असते. वर्षांनुवर्षे या अंगणवाडी सेविका मानधनात वाढ व्हावी यासाठी सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. सध्या या अंगणवाडी सेविकांना पाच हजार रुपये आणि मदतनीसांना अडीच हजार रुपये मानधन सरकारकडून देण्यात येते. मात्र हे मानधन तसेच पोषण आहाराची रक्कम अनेकदा महिने महिने मिळतच नसल्याचे ‘अंगणवाडी कृती समिती’चे म्हणणे आहे. अंगणवाडी सेविकांना योग्य मानधन मिळावे यासाठी शासनानेच महिला व बालविकासमंत्री पंकजा मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली होती. या समितीत विभागाच्या सचिव तसेच कृती समितीचे सदस्य आदींचा समावेश होता. या समितीने अंगणवाडी सेविकांना किमान आठ ते साडेतेरा हजार रुपये मानधन मिळावे, अशी शिफारस सरकारला केली आहे. तसेच यासाठी ७०० कोटी रुपयांची तरतूद करण्याचा प्रस्ताव अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सादर केल्याचे पंकजा मुंडे यांचे म्हणणे आहे. मात्र प्रत्यक्षात ही वाढ देण्याचे सरकारने नाकारल्यामुळे रीतसर दोन महिन्यांची नोटीस देऊन दोन लाख सहा हजार अंगणवाडी सेविका ११ सप्टेंबरपासून संपावर गेल्या आहेत. यामुळे अंगणवाडय़ांमध्ये मिळणाऱ्या पोषण आहारापासून ७३ लाख बालके गेले सतरा दिवस वंचित असून याचा मोठा फटका या बालकांना बसत आहे. या संपकाळात गेल्या सतरा दिवसांत १२५ बालकांचा मृत्यू झाला असून पोषण आरोग्य केंद्रांमध्ये सुमारे अडीच हजार बालकांना उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *