साऊथ केरोलिना येथे फायटर जेट एफ-१६ या विमानाने सेसेना या छोट्या विमानाला धडक दिल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात सेसेना जातीच्या सी-१५० या छोट्या विमानाचा चक्काचूर झाला. तसेच त्या विमानातील दोघांचा मृत्यू झाला.
तर जेट एफ-१६ मधील वैमानिक मात्र सुरक्षित बाहेर पडला आहे. अमेरिकेच्या राष्ट्रीय वाहतूक सुरक्षा मंडळाचे प्रवक्ते पिटर क्नुडसन यांनी ही माहिती दिली.
स्थानिक वेळेनुसार, सकाळी अकराच्या सुमारास साऊथ केरोलिनातील चार्ल्सटनपासून ३२ किमी. अंतरावर हा अपघात झाला. शॉ एअरफोर्स तळावरुन एफ-१६ जेटने उड्डाण घेतले होते.
या अपघातात जेट एफ-१६ मधील वैमानिक सुरक्षितरित्या कसा काय बचावला आणि हा अपघात नेमक्या कोणत्या कारणामुळे झाला याचा तपास अमेरिकन हवाई दलाच्या संबंधित विभागामार्फत करण्यात येत आहे.
दरम्यान, या अपघातात विमानाचे अवशेष या भागातील शेतात सर्वत्र पसरले आहेत. मात्र कोणतीही नागरी जिवितहानी झाल्याचे वृत्त नाही.

