जपान देश आपल्या अनेक गोष्टींसाठी प्रसिद्ध आहे. जपानमधील बुलेट ट्रेन हा यातलाच एक भाग. भारतातही जपानच्या साह्याने लवकरच बुलेट ट्रेन सुरु होणार असून मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेनच्या प्रकल्पाचे भूमिपूजन आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान शिंजो आबे यांच्या हस्ते झाले. यामुळे मुंबई-गुजरातमधील अंतर अवघ्या तीन तासांवर येणार आहे. या प्रकल्पासाठी १ लाख १० हजार कोटींचा खर्च अपेक्षित असून पाच वर्षांमध्ये हा प्रकल्प पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे.
या बुलेट ट्रेनकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहीले असतानाच बुलेट ट्रेनसंदर्भातील अन्य एका गोष्टीची चर्चा सध्या रंगली आहे. या ट्रेनच्या स्वच्छतेबाबत नेमकी कशी सुविधा असणार याबाबत प्रवाशांमध्ये उत्सुकता आहे.
विशेष म्हणजे जपानमध्ये बुलेट ट्रेनची स्वच्छता अवघ्या सात मिनिटांत करण्यात येते. सात मिनिटांत ही सफाई होते, म्हणजे ही सफाई कशी असेल असा प्रश्न आपल्याला पडला असेल. मात्र प्रत्येक कोचमध्ये कोपऱ्यातून अतिशय व्यवस्थितपणे सफाई केली जाते. प्रत्येक गोष्ट वेळेवर करणाऱ्या जपानमध्ये क्वचितच ट्रेन उशिराने धावत असून, ट्रेनची स्वच्छता हे ट्रेन लेट होण्यामागचे हे एक प्रमुख कारण आहे. मात्र ट्रेन लेट होण्याचा कालावधी ऐकून तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. हा कालावधी केवळ ३६ सेकंदाच्या आसपास असतो.
ट्रेन स्टेशनवर पोहोचण्याच्या आधीच हे सफाई कामगार स्टेशनवर तयार असतात. आपल्याला उशीर झाल्यास ट्रेन प्रवाश्यांनी भरेल आणि नीट साफसफाई करता येणार नाही हे त्यांना माहित असते त्यामुळे ते अतिशय तत्परतेने काम करतात. टोकियो स्टेशनवर दिवसभरात जवळपास २१० वेळा बुलेट ट्रेन येते. ज्या कंपनीला हे सफाईचे काम देण्यात आले आहे त्यांच्याकडे ८०० कर्मचाऱ्यांची फौज आहे. विशेष म्हणजे शेवटच्या स्थानकावर पोहचलेल्या ट्रेनची सफाई करण्यासाठी उभे असलेले हे सफाई कामगार सेवेची संधी दिल्याबद्दल ट्रेनमधून उतरत असलेल्या प्रवाशांचे आभार मानतात. त्याचबरोबर त्यांनी स्वच्छ केलेल्या ट्रेनमधून प्रवास करण्यासाठी आलेल्या प्रवाशांचे स्वागत करतात. प्रवासी ट्रेनमध्ये चढउतार करत असताना हे सफाई कामगार त्यांचे स्वागतही करतात.
