‘नाविका सागर परिक्रमा’ या उपक्रमांतर्गत नौदलच्या महिला अधिकाऱ्यांचा चमू जगप्रवासाला रवाना झाला आहे. भारतीय बनावटीच्या आयएनएसव्ही ‘तारिणी’ या नौकेतून हा जगप्रवास होणार आहे. गोव्यात संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांनी या नौकेला हिरवा झेंडा दाखवला.
जगभ्रमंतीसाठी निघालेल्या आयएनएसव्ही तारिणीतल्या चमूमध्ये – लेफ्टनंट कमांडर वर्तिका जोशी, लेफ्टनंट कमांडर प्रतिभा जामवाल, लेफ्टनंट कमांडर स्वाती पी, लेफ्टनंट ऐश्वर्या बोद्दापती, लेफ्टनंट विजया देवी आणि लेफ्टनंट पायल गुप्ता यांचा समावेश आहे.
या जलप्रवासाकरता सर्व महिला अधिकाऱ्यांना योग्य प्रशिक्षण देण्यात आलं आहे. प्रशिक्षणाचा भाग म्हणून त्यांनी आयएसएनव्ही म्हादई आणि आयएसएनव्ही तारिणी मधून मोहिमेआधी सुमारे 20 हजार सागरी मैलाचा जलप्रवास केला. यामध्ये 2016 आणि 2017 मधल्या दोन मोहिमा आणि डिसेंबर 2016 मधल्या गोवा ते केप टाऊन या जलप्रवासाचा समावेश होता.
या मोहिमेला ‘नाविका सागर परिक्रमा’ हे नाव देण्यामागे देशातील महिला सशक्तीकरणाला मजबूती देणं आणि भारतीय नौसेनेतर्फे सागरी नौकानयनाचा प्रसार करणं हा उद्देश आहे.
